आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Motion Confidence Passed On Aurangabad Municipal Corporation

आयुक्तांवर अविश्वास मंजूर, औरंगाबाद मनपात सेना, भाजपला एमआयएमची ‘ऐनवेळी’साथ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मागील सात महिन्यांपासून सुरू असलेल्या नगरसेवक, पदाधिकारी विरुद्ध मनपा आयुक्त संघर्षाची मंगळवारी अखेर झाली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आयुक्त प्रकाश महाजन यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ९५ विरुद्ध १३ मतांनी मंजूर करण्यात आला. शिवसेना आणि भाजपच्या साथीला ऐन वेळी एमआयएमही आल्याने ७१च्या आकड्याची मर्यादा ओलांडली गेली. आता स्मार्ट सिटीचे आव्हान समोर असताना नवीन आयुक्त कोण येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील सगळे विषय बाजूला सारत मनपा आयुक्तांवरील अविश्वास ठराव हा विषय चर्चेला घेण्यात आला. सोमवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी ठराव मंजूर होणार हे स्पष्ट झाले होते. शिवसेनेने एमआयएमला गाठीला बांधत आकड्यांचे गणित मजबूत करून घेतले. दरम्यान भाजपनेही आपले धोरण जाहीर केले. चर्चेत सगळ्याच नगरसेवकांनी ठरावात केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार करत आयुक्तांना परत पाठवण्याची मागणी केली. साडेअकरा वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या या विषयावर दुपारी १ वाजून दहा मिनिटांनी मतदान घेण्यात आले. ठरावाच्या बाजूने व विरोधात असे दोन कक्ष करत मतदान घेण्यात आले. ठरावाच्या बाजूने जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी अगदी तुरुंगात असलेल्या राजू तनवाणी यांनाही न्यायालयाच्या परवानगीने आणण्यात आले होते. अर्ध्या तासात मतदानाची प्रक्रिया आटोपली व महापौरांनी हा ठराव ९५ विरुद्ध १३ मतांनी मंजूर झाल्याचे सांगत नवीन आयुक्तांची सरकारकडून नियुक्ती होईपर्यंत अतिरिक्त आयुक्त रमेश पवार काम पाहतील, असे निर्देश दिले. याविषयी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आयुक्त महाजन यांच्याशी 'दिव्य मराठी'ने वारंवार संपर्क केला; पण त्यांनी या विषयावर काही बोलायचे नाही, असे सांगून उत्तर टाळले.

नगरविकासकडे डोळे
सर्वसाधारण सभेने घेतलेल्या या ठरावाची व निर्णयाची प्रत नगरविकास मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे. नगरविकास मंत्रालय हा ठराव मान्य करायचा की विखंडित करायचा यावर निर्णय घेईल. नगरविकास खात्याने ठरावाला मान्यता दिली, तर शासनाला नवीन आयुक्त द्यावा लागेल. स्मार्ट सिटीची घाई पाहता पुरेसा कालावधी असलेले आयुक्त शहरात यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत जिल्हाधिकारी अथवा तत्सम दर्जाच्या अधिकाऱ्याकडे प्रभारी आयुक्ताचा कार्यभार दिला जाऊ शकतो.
या नगरसेवकांनी मागितले मतदान
एमआयएमने यू टर्न घेतल्यानंतर अविश्वास ठरावाच्या विरोधात फक्त काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवकच उरले. त्या १३ नगरसेवकांनी महापौरांना या ठरावावर मतदान घेण्याची मागणी केली. त्यानुसार मतदान घेण्यात आले. त्या नगरसेवकांची नावे पुढीलप्रमाणे : भाऊसाहेब जगताप, अफसर खान, शेख सोहेल, अयुब खान, अनिता साळवे, वैशाली जाधव, रेश्मा कुरेशी, अब्दुल नावेद, मलिका बेगम हबीब कुरेशी, शबनम बेगम कलीम कुरेशी, मुल्ला सलिमा बेगम, अंकिता विधाते, ज्योती वाघमारे.

९५ विरुद्ध १३ मतांनी मंजुरी
११३ एकूण सदस्य
१०८ उपस्थित सदस्य
0५ गैरहजर सदस्य

ठरावाच्या बाजूने : ९५
ठरावाच्या विरोधात : १३

अकलाखला श्रद्धांजली
गोमांस भक्षणावरून उत्तर प्रदेशातील दादरीतील हल्ल्यात मरण पावलेल्या महंमद अकलाख याला औरंगाबाद मनपाच्या सर्वसाधारण सभेने श्रद्धांजली वाहिली. एमआयएमने मांडलेल्या या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला. ही चकमक झडत असताना भाजपच्या नगरसेवकांनी मात्र मौन बाळगणेच पसंत केले.

औरंगाबाद मनपाच्या सर्वसाधारण सभेत प्रारंभीच एमआयएमचे नगरसेवक विकास एडके यांनी दादरी प्रकरणात ‘शहीद’ महंमद इकलाखच्या श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. त्यांनी दादरीचा उल्लेख करताच शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक होऊन उभे राहिले. सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी दादरीत मरण पावलेल्या व्यक्तीला शहीद संबोधून वातावरण बिघडवू नये, असे म्हटले. यावर एमआयएमचे नगरसेवक व काँग्रेसचे अफसर खान चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी इकलाख यांना श्रद्धांजली वाहिलीच पाहिजे, असा आग्रह धरला. हे सारे घडत असताना भाजपची मात्र चांगलीच अडचण झाली. एमआयएमला विरोध करत शिवसेनने बाजू लावून धरली. महापौरांनी रुलिंग दिल्याने दादरीप्रकरणी श्रद्धांजली अडचणीची ठरू शकते, हे पाहून लगेच त्यात आणखी एक नाव घुसवत ठराव मंजूर करण्यात आला.