आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनोग्राफीद्वारे नव्हे आता ‘युरिन टेस्ट’द्वारे लिंगनिदान; परदेशातून किटची आयात!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सोनोग्राफीच्या माध्यमातून लिंगनिदान करण्याची आता गरज भासणार नाही. कारण अद्ययावत ‘युरिन टेस्ट’द्वारे लिंगनिदान करणार्‍या तंत्रज्ञानाचा शोध लागला असून त्याचा वापरसुद्धा सुरू झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे औरंगाबादेतील काही उच्चभ्रू महिलांनी अत्यंत गोपनीयपणे त्यांना अपेक्षित असलेल्या मुलांना याच तंत्रज्ञानाने जन्म दिला आहे.
सोनोग्राफीला मोडीत काढू शकेल असे हे तंत्रज्ञान विदेशातून औरंगाबादेत आयात केले जात आहे. केवळ एका साध्या सोप्या ‘युरिन टेस्ट’ने गर्भाच्या सातव्या आठवड्यातच लिंगनिदान होत असून, त्याचे किट छुप्या पद्धतीने आयात केले जात आहे. शहरातील उच्चभ्रू हे किट मागवत असून त्याचा सर्रास वापर सुरू आहे. शहरातील एका नामांकित स्त्रीरोगतज्ज्ञाने ही माहिती दिली.
‘युरिन टेस्ट किट’ला भारतात कायदेशीररीत्या मान्यता नाही. तथापि, मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये या ‘किट’चा वापर होत आहे. औरंगाबादेत याचा वापर वाढत असून, अलीकडेच दोन उच्च्चभ्रू महिलांनी याचा वापर केल्याचे त्यांनी एका प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञाला सांगितले. अमेरिकेत अस्तित्वात आलेले हे तंत्र आता हळूहळू संपूर्ण जगभरात पोचत असले तरी खुद्द अमेरिका अथवा युरोपात त्याचा सर्रास वापर सुरू झालेला नाही. अमेरिकेतील ‘एफडीए’ची त्याच्या वापरास मान्यता नसल्याचे समजते.
कशासाठी लावला शोध?- ‘युरिन टेस्ट किट’ तंत्राचा शोध अमेरिकेने लिंगनिदानासाठी नव्हे तर नवजात बालकांमध्ये जनुकीय दोष (जेनेटिक डिसॉर्डर) आहेत किंवा नाहीत, जन्मापूर्वीच समजावे यासाठी लावला. काही विशिष्ट जनुकीय दोषांमध्ये अशा प्रकारची मुले जन्माला येण्याची शक्यता असल्यानेच अँम्नियो सेटेन्सिस (गर्भाशयातील अर्भकाच्या जवळील द्रवाची सूईद्वारे तपासणी) व कोरिऑनिक व्हिलस् सॅम्पलिंग (सीव्हीएस, गर्भाशयातील प्लॅसेन्टाच्या छोट्या भागाची तपासणी) या तपासण्या केल्या जातात. या दोन्ही तपासण्या अल्ट्रा सोनोग्राफीच्या सहाय्याने केल्यास बर्‍याच खर्चिक व क्लिष्ट आहेत. ते टाळण्यासाठी अगदी घरच्या घरी शक्य सोप्या व सुटसुटीत युरिन टेस्टचा शोध लागला. मात्र त्याचा गैरवापर भारतात लिंगनिदानासाठी होत असून, त्याचे मार्केट वाढविण्यासाठी विविध एजन्सी छुप्या पद्धतीने कार्यरत आहेत.
माहितीस्रोत छुप्या पद्धतीने कार्यरत- लिंगनिदान करणार्‍या वेगवेगळ्या किटची माहिती छुप्या पद्धतीने पुरविली जात आहे. अलीकडे ‘विमेन्स चॅट ग्रुप’मध्ये चारशे-पाचशे महिला असतात. त्यांच्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर ऑनलाईन चॅटिंग होत असते. या चॅटिंगच्या माध्यमातून किटची इत्यंभूत माहिती मिळते. तसेच पंचतारांकित स्पा, ब्युटी पार्लरमधूनही याचे एजन्ट फिरत असतात. नेटवर्क मार्केटिंगच्या एजन्टांद्वारे हे किट ग्राहकांपर्यंत पुरविले जात आहे.
ब्लड टेस्ट किट हा दुसरा पर्याय- युरिन टेस्टद्वारे लिंगनिदान होण्याविषयी काहीजण साशंक असले तरी ब्लड टेस्टद्वारे निश्चितपणे लिंगनिदान होऊ शकते, याविषयी तज्ज्ञांमध्ये संभ्रम नाही. गंभीर बाब म्हणजे हे किटही अनेकांना ‘सहजसाध्य’ होत असल्याची माहिती आहे. या किटमध्ये रक्त वेगळे (सेपरेशन मेथड) करून केवळ ‘सिरम’ टाकले जाते व गर्भाच्या सातव्या आठवड्यात ब्लू-पिंक रिझल्ट मिळू शकतो. याच्या परिणामाची अचूकता तर 99 टक्कयांपर्यंत असल्याचे दावे कंपन्या करतात. तथापि, ब्लड टेस्टपेक्षा युरिन टेस्ट अधिक सोपी व घरच्या घरी करणे शक्य असल्यानेच त्याच्या मागे जग धावत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
थायलंडमध्ये तयार होते हवे तसे मूल!- थायलंडमध्ये हवे त्या लिंगाचे अर्भक चक्क ‘तयार’ केले जाते. त्यासाठी हव्या त्या गुणसूत्रांची (क्रोमोझोम) रचना बदलली जाते. त्यानंतर संबंधित स्त्रीच्या गर्भात तशा प्रकारच्या स्त्री व पुरुष बिजाचे मिलन घडवून आणले जाते. या प्रक्रियेला पीजीडी अर्थात प्री इम्प्लॅन्टिक जेनेटिक डायग्नोसिस असे म्हटले जाते. हे तंत्रज्ञान 8-9 लाखांच्या पॅकेजमध्ये विकले जाते. अनेक ‘हाय प्रोफाईल’ आसामींसह बॉलिवूडमधील कलावंतांनी याचा फायदा घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. महानगरातील असंख्य उच्चभ्रू या पॅकेजचा सर्रास वापर करीत आहेत.
अशी होते किटची आयात- काही इच्छूक स्वत: तर काही जण विदेशातील नातेवाईकांच्या माध्यमातून किट आयात करीत आहेत. काही कंपन्या इंटरनेटच्या माध्यमातूनही किट पाठवत असल्याची माहिती समोर आली आहे.