आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मराठवाड्यातील कोणीच मदतीला आला नाही'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - निळवंडे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मराठवाड्यातील कोणीच मदतीला आला नाही. मग हक्काचे पाणी मागता कसे? असा थयथयाट राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा नगरचे पालकमंत्री मधुकर पिचड यांनी केला.

मुळा धरणातून जायकवाडीत येणारे पाणी बंद केल्यानंतर दोन दिवसांपासून डाव्या-उजव्या कालव्यातून विसर्ग सुरू आहे. पिचड यांच्या आदेशाने जायकवाडीचे पाणी बंद झाले. यासंदर्भात ते म्हणाले, मराठवाडा मदतीला येत नाही, मग हक्काचे पाणी मागतो कसा? मी मराठवाडाविरोधी नाही. उन्हाळ्यात विरोध पत्करून पाणी सोडले होते.

वरील धरणे भरली आहेत. तरीही जायकवाडीत पाणी सोडणे थांबवले आहे. दोन दिवसांत मुळाच्या दोन्ही कालव्यांतून 6.18 दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. नांदूर-मधमेश्वरमधून 5.36 दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. वरची धरणे भरली असतानाही कालव्यातून पाणी सोडून धरणातील साठा कमी केला जात आहे. कालव्यांच्या माध्यमातून पिकांच्या नावाखाली तळी भरून घेतली जात आहेत. जायकवाडीत पाणी सोडले जाऊ नये यासाठीच हे धोरण हाती घेतल्याचे दिसते.


‘नदी काय मालकीची’
हा पोरकटपणा व अपरिपक्वतेचे लक्षण आहे. नदीची मालकी पिचडांची आहे काय? अशी दंडेलशाहीची भाषा पिचडांनाच येते का? कायद्याचे राज्य आहे हे मंत्र्यांनी लक्षात ठेवावे.’ विजय दिवाण, जलतज्ज्ञ


वेगळेपणाची भावना!
जायकवाडीच्या वर नियमाच्या विरुद्ध धरणे बांधली. आम्हाला उपकार नको, हक्काचे पाणी सोडा. मंत्र्याची भूमिका चुकीची आहे. यामुळे मराठवाडा वेगळा मागण्याची वेळ येऊ शकते.’ संजय शिरसाट, आमदार, शिवसेना


दबाव कमी पडतो
मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बैठक बोलावली नाही. पत्रही पाठवले. मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींचा दबाव कमी पडत आहे. पिकाच्या नावाखाली तलाव भरून घेण्याची ही लबाडी सुरू आहे.’ या. रा. जाधव, जलतज्ज्ञ