आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसला भारतात मुळीच थारा मिळणार नाही, औरंगाबाद शहरातील मुस्लिमांनी ठणकावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या एक हजार वर्षांपासून मुस्लिम भारतात गुण्यागोविंदाने नांदत आहेत. कारण येथील ९९ टक्के हिंदूंमध्ये त्यांच्याविषयी आपुलकीची भावना आहे. मुस्लिमांमध्येही हिंदूविषयी आपुलकीच आहे. हिंंदूंना जेवढा हा देश आपला वाटतो, तेवढाच आम्हालाही वाटतो. त्यामुळे येथे इसिसला थारा मुळीच मिळणार नाही, असे औरंगाबादच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मुस्लिमांनी ‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित टॉक शोमध्ये ठणकावून सांगितले.

गेल्या आठवड्यात (एनआयए) राष्ट्रीय तपास संस्थेने देशभरात सुमारे २२ तरुणांना इसिसशी संबंध किंवा संपर्कात असल्याच्या कारणावरून ताब्यात घेतले. त्यात वैजापूरच्या इम्रान पठाणचाही समावेश आहे. देशात इसिसचे अस्तित्व असल्याचेही सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर मुस्लिमांना नेमके काय वाटते. गरिबीशी लढणाऱ्या या समाजाला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रसार माध्यमे, इतर समाजाविषयी त्यांच्या काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेण्यासाठी शनिवारी ‘दिव्य मराठी’ने टॉक शोचे आयोजन केले होते. त्यात प्रा. डॉ. रशीद मदनी, प्रा. डॉ. शाहेद शेख, अदिल मदनी, साजिद पाशा, आवेस अहेमद आदींसह मान्यवरांनी सहभाग घेतला.

त्यांची मते त्यांनी अतिशय मनमोकळेपणे मांडली. ते म्हणाले की, प्रत्येक समाजात काही काळे डाग असतातच. पण त्याकरिता पूर्ण समाजाला गुन्हेगार, दहशतवादी म्हणणे चुकीचे आहे. इसिसची विचारसरणी पूर्णपणे इस्लामविरोधी आहे. त्यामुळे इसिसला भारतात कधीच थारा मिळणार नाही. इसिसने कधी देशात शिरण्याचा प्रयत्न केलाच तर तो हाणून पाडण्यासाठी आम्ही आमची पूर्ण ताकद पणाला लावू.