आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रक्रिया नाही तरीही जालना रोडच्या कामाचा केला दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-२११ चा पूर्वीचा भाग असलेल्या जालना रोडचा विकास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केला जाईल, असे केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले होते. लवकरच याची प्रक्रिया सुरू होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु प्राधिकरणाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घोषणेनंतर यात अजून कोणतीही प्रगती होऊ शकलेली नाही. डीपीआर तयार करण्याबरोबरच अन्य कोणत्याही बाबीसाठी लेखी सूचना येथील कार्यालयाला प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले.
डीपीआरसाठी नव्याने प्रक्रिया करण्याची गरज नाही. हा रस्ता येडशी-धुळे या रस्त्याचाच भाग असल्याने डीपीआर तयार झाला आहे. त्यामुळे एप्रिलपर्यंत रस्त्याचे काम सुरू होईल, असे आमदार अतुले सावे यांनी स्पष्ट केले.
मनपाकडे निधी नसल्याने जालना रस्त्याचे काम प्राधिकरणाने करावे, अशी मागणी आमदार अतुल सावे यांच्यासह भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यास तत्त्वत: मंजुरी देण्यात आल्याचे गडकरी यांनी लगेच जाहीर केले होते. तशी घोषणा त्यांनी गेल्या महिन्यात औरंगाबादला झालेल्या औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या शुभारंभ कार्यक्रमात केली होती. केंद्राच्या प्राधिकरणाकडे पुरेसा निधी असल्याने राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे रस्तेही त्यांनी करावेत, अशी मागणी करण्यात आली होती. त्यात हर्सूल टी पाॅइंट ते सिडको बसस्थानक सिडको बसस्थानक ते मुकुंदवाडी रेल्वे स्थानकमार्गे शिवाजीनगर या रस्त्याची मागणीही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून गडकरी यांच्याकडे करण्यात आली.

२५ डिसेंबरला झालेल्या या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आणखी मागण्याही मान्य करण्यात येतील, असे गडकरी यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे औरंगाबाद शहरासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आणखी निधी मिळेल अन् शहरातील रस्त्यांची कामे होतील, असे चित्र निर्माण झाले. गडकरी यांच्या घोषणेला २० दिवस लोटून गेले तरी अजून प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू झालेली नाही. प्राधिकरणाच्या स्थानिक कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घोषणा झाली असली तरी अजून लेखी स्वरूपाच्या कोणत्याही सूचना केल्या नाहीत.

उड्डाणपूल किती?
जालना रस्त्यावर किती उड्डाणपूल होणार, त्याचे नियोजन झालेले नाही. मात्र, ही प्रक्रिया तातडीने पूर्ण होईल. तसेच एप्रिल महिन्यात या रस्त्याचे काम सुरू होऊ शकेल, असे सावे यांनी स्पष्ट केले. याचा पाठपुरावा मी सातत्याने करत असल्याचे त्यांनी सांगितले.