औरंगाबाद - जुन्या टीडीआर धोरणामुळे जुन्या शहराचा खुंटलेला विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी मनपाने नवीन टीडीआर धोरण लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. दुसरीकडे सिडकोतील घरांची मालकी सिडकोची असल्याने तेथे टीडीआरचे धोरण राबवता येणार नाही. त्यासाठी वेगळा प्रस्ताव तयार करून पाठवण्याचा निर्णय आज सर्वसाधारण सभेने मंजूर केला.
महापालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत टीडीआर व नवीन विकास नियंत्रण नियमावली राबवण्याबाबत प्रशासनाने प्रस्ताव मांडले होते. या प्रस्तावांना मान्यता द्यावी, अशी बहुतेक सर्वांचीच भूमिका असली तरी सिडकोविषयी नगरसेवकांनी
आपल्या चिंता बोलून दाखवल्या.
नगरसेवक प्रशांत देसरडा, राजू वैद्य, वीरभद्र गादगे, प्रमोद राठोड, काशीनाथ कोकाटे आणि इतरांनी टीडीआरवरील निर्बंध हटवल्याने नागरिकांना फायदा होणार असला तरी सिडको आणि हडकोतील नागरिकांना तो मिळणार की नाही, याबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. राजू वैद्य यांनी भूसंपादनात रस्त्यांसाठी जुन्या शहरातील नागरिकांनी आपल्या मालमत्ता दिल्या, त्यांना आपण मोबदला दिलेला नाही; पण या धोरणानुसार किमान टीडीआर तरी द्या, तशी सरकारकडे विनंती करा, अशी मागणी केली. गावठाणासाठी टीडीआरची परवानगी देण्याची मागणीही काही नगरसेवकांनी केली.