आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याकडे पावसाची पाठ; खरिपाचे उत्पादन 50 टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यात गेल्या काही दिवसात मोठा पाऊस झालेला नाही. पावसाने पाठ फिरवली असून आता कडक ऊन पडण्यास सुरुवात झाली आहे. जमिनीतील ओलावाही कमी झाला आहे. परिणामी पिके सुकली आहेत. याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे.
 
कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार खरिपाचे उत्पादन 50 टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे. पीक परिस्थिती व हवामानाचा ताजा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. जालना, अंबड, घनसावंगी व बदनापूर तालुक्यातील पिकांची स्थिती पावसाअभावी अत्यंत बिकट झाली आहे. आठवडाभरापूर्वी चांगल्या स्थितीत असलेली भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील पिके सुकली आहेत. पाऊस नसल्याचा सर्वाधिक फटका मूग व उडीद पिकास बसला आहे. उडिदाचे पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असून, मूग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. दोन्ही पिकांचे उत्पादन पन्नास टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. 
 
तुरीच्या 53 हजार 678 हेक्टवरील पिकाची वाढ खुंटली आहे. सरासरीच्या 161.3 हेक्टरवर पेरणी झालेले सोयाबीन फुलोऱ्याच्या अवस्थेत असून, त्यावर उंट अळी व चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव आहे. तूर व सोयाबीनचे उत्पादन 25 ते 50 टक्के घट अपेक्षित आहे. बागायती कापसाचे पीक वाढीच्या अवस्थेत असून, कोरडवाहू कापसाची वाढ खुंटली आहे. ठिबकच्या मदतीने विहिरीतील अल्प पाण्यावर कापूस पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पाहायला मिळत आहे.
 
बाजरी व मका पिकाची स्थिती अत्यंत नाजूक आहे. यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पेरणी व लागवडीची कामे सुरू केली. सुरुवातीला काही भागात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने मशागतींच्या कामांना वेग आला होता. शेतकऱ्यांनी आतापर्यंत बी-बियाणे, खते, औषधी यावर मोठा खर्च केला आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने हा सर्व खर्च वाया जाण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...