आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महागाईचा भडका: गहू, डाळी महागल्या!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आवक घटल्याने बाजरी व गव्हाच्या किमतीत 300 रुपयांनी वाढ झाली आहे. डाळीही दहा रुपयांनी वाढल्या असून उलट शाळू ज्वारी मात्र 500 रुपये आणि भाजीपाला 5 ते 20 रुपयांनी स्वस्त झाले आहे. समाधानकारक पाऊस न झाल्यास किमती आणखी भडकण्याची शक्यता व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे.
महिनाभरापासून गव्हाच्या किमतीत सतत वाढ होत आहे. एक महिन्यापूर्वी 11 ते 15 रुपये किलो गव्हाचा भाव होता. पंधरा-वीस दिवसांत तो 13 ते 15 रुपये किलो झाला. आता त्यात आणखी 3 रुपयांची वाढ झाली आहे. मध्य प्रदेशातून येणार्‍या शरबती गव्हाचे भाव 2400 रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे तूर, मूग, उडीद, मसूर, हरभरा, मटकी, चवळीच्या किमतीत किलोमागे दहा रुपये वाढले आहेत. आगामी काळात तूर डाळही महागणार असल्याचे संकेत व्यापार्‍यांनी दिले आहेत.
शाळू ज्वारी उतरली
आवक वाढल्याने शाळू ज्वारीच्या किमतीत घट झाली आहे. 30 रुपये किलो असणार्‍या शाळूचे भाव 5 ते 10 रुपयांनी उतरले आहेत. अधूनमधून पडणार्‍या पावसाच्या हलक्या सरींमुळे भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यामुळे 5 ते 20 रुपयांपर्यंत भाज्यांचे भाव सध्या घसरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र, दुष्काळाचे सावट अद्याप कायम असून समाधानकारक पाऊस न झाल्यास चिंताजनक परिस्थिती निर्माण होईल, असा सूर सर्वच थरातून व्यक्त होत आहे.
कारणे अनेक, नुकसान सर्वसामान्यांचेच
आवक कमी होत आहे
पावसाच्या लहरीपणामुळे धान्याच्या उत्पादनात घट होत आहे. सध्या शाळू ज्वारी वगळता गहू, बाजरी, डाळीची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे भाववाढ होत आहे. आणखी आठ ते दहा दिवस समाधानकारक पाऊस पडला नाही तर गंभीर परिस्थिती निर्माण होईल. संजय पंडित, धान्य विक्रेता.
महागाईचा फटका
गरीब व मध्यमवर्गीयांना जीवन जगणे कठीण होत चालले आहे. हातावर पोट असणार्‍यांचे तर काहीच खरे राहिलेले नाही. धान्याचे भाव रोज वाढतच चालले आहेत. त्यामुळे आर्थिक गणित बिघडते. पाऊस पडला नाही तर परिस्थिती चिंताजनक होईल. संगीता अशोक सोनवणे, गृहिणी