आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागा ठरली नाही, तरीही सॉर्टिंग शेडला मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्मार्ट सिटीकडे पाऊल टाकत कोरड्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने शहरात ठिकाणी सॉर्टिंग शेड उभारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला. हे शेड नेमके काेणत्या जागी होणार, त्यासाठी किती जागा लागेल, शेडचे क्षेत्रफळ, आकार किती असेल, किती मनुष्यबळ तेथे लागेल, खर्च किती येईल, महानगरपालिकेकडून ते चालेल की खासगी संस्थांकडून चालवले जाईल, यापैकी कशाचीही माहिती प्रस्तावात नाही की अधिकाऱ्याने ऐनवेळी दिली नाही, तरीही समितीने एकमताने ‘मंजूर, मंजूर’चा नारा दिला.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगरपालिका, सीआरटी, सीआयआय आणि बजाज यांच्या सामंजस्य करारातून ११५ वाॅर्डांपैकी ३६ ठिकाणी हा प्रयोग करण्यात येत आहे. यामुळे नारेगाव येथील कचरा डेपोत जाणाऱ्या कचऱ्याची संख्या कमी झाली आहे. भविष्यात सर्वच वाॅर्डात हा प्रकल्प राबवण्यात आला तर कचरा डेपोची समस्या कमी होणार हे नक्की आहे. प्रकल्प चांगला आहे, हे सर्वांना माहिती असले तरी जेथे प्रकल्प राबवला जातोय, तेथे नेमके काय करायचे हे पालिका अधिकाऱ्यांनाच पूर्णपणे माहिती नाही.

तरीही सभापती मोहन मेघावाले यांनी प्रस्ताव मंजूर केला. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर जागा ठरल्यानंतर पुन्हा प्रस्ताव आमच्यासमोर ठेवा, अशीही सूचना त्यांनी केली. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर नेमके काय केले हे सभागृहाला सांगितले जाईल. म्हणजे त्यात नंतर सुधारणा करण्याचे अधिकार सभागृहाला असणार नाही.

या वसाहतींमध्ये हाेणार सॉर्टिंग शेड
सिपेट कंपनी मैदानाजवळ, जाधववाडी मार्केट कमिटीजवळ, मजनू हिलजवळ, मौलाना आझाद रिसर्च सेंटरजवळ, मध्यवर्ती जकात नाका, विठ्ठलनगर जैन मंदिराच्या मागे, अग्निहोत्र चौकाच्या बाजूला आणि एसआरपी कॅम्प.

फक्त प्रस्ताव मंजूर केला
मनपाप्रशासनाने प्रस्ताव सादर केला. परंतु विठ्ठलनगर मंदिर, मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे सॉर्टिंग शेडला नागरिकांनी विरोध केला तेव्हा या जागा अंतिम नसल्याचे सांगण्यात आले. स्थळ पाहणीनंतर निर्णय घेतला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका शेडसाठी किती जागा लागते, हेही अधिकाऱ्यांनी सांगितले नाही. एका शेडच्या ठिकाणी किती कर्मचारी लागतील, याचेही उत्तर माहिती नाही, अजून ठरले नाही, असेच होते.

सध्या सुरू असलेल्या साॅर्टिंग शेडमध्ये काय हाेते
>पूर्वी प्लास्टिक, कागद जमा करण्यासाठी कचरा वेचक कुंडीत उतरत होते. आता त्यांना बाजारपेठेत चांगला भाव असलेल्या वस्तू एकाच जागी मिळतात. त्यातून चांगली कमाई होत असल्याने त्यांचे जीवनमान सुधारले. काही वॉर्डांतून कचरा कुंड्या गायब झाल्याचे सीआरटीच्या संयोजक गौरी मिराशी यांनी सांगितले.
>वर्गीकरण केलेल्या कचऱ्याचा रिसायकलिंगसाठी अधिकाधिक वापर करत नारेगाव डेपोवर पडणारा ताण कमी करणे, हे मनपाचे अंतिम उद्दिष्ट आहे.
>तेथे ५० वाॅर्डांतून गाेळा हाेणाऱ्या सुमारे अडीच टन सुक्या कचऱ्यातून सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत कागद, पुठ्ठा, पॉलिथीन, प्लास्टिक, काच आणि धातू तसेच पांढरा कागद, वृत्तपत्रे, रंगीत कागद असे वर्गीकरण करतात. सायंकाळी वर्गीकरण केलेला कचरा रद्दी, भंगार विक्रेत्यास विकला जातो.
बातम्या आणखी आहेत...