आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात मागणीनुसार पुरवठा करताना महावितरणची तारेवरची कसरत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - थंडीचे दिवस असूनही राज्यात विजेची मागणी 16 हजार 283 मेगावॅटवर जाऊन पोहोचल्याने मागणी व पुरवठ्याचा मेळ घालण्यासाठी ग्रामीण भागात सध्या 14 ते 16 तासांचे भारनियमन केले जात आहे. यामुळे शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी हतबल झाले आहेत.
राज्यात विजेची मागणी सतत वाढत आहे. एरवी विजेची गरज 14 हजार 50 मेगावॅट इतकी आहे. 5 जानेवारी रोजी त्यात 1 हजार 7 मेगावॅटने वाढ होऊन ती 16 हजार 57 मेगावॅटवर जाऊन पोहोचली. 14 जानेवारीला त्यात पुन्हा 226 मेगावॅटची वाढ होऊन ती 16 हजारांच्या पुढे गेली. मागणी व पुरवठ्याचे संतुलन राखण्यासाठी महावितरणकडून ज्या भागात विजेची तूट जास्त आणि वीज बिल वसुलीचे प्रमाण अत्यल्प आहे अशा भागांत 14 ते 16 तासांचे भारनियमन केले जात आहे. औरंगाबादसह मराठवाडा, खान्देश, विदर्भातील शेतकरी, व्यावसायिक, ग्राहक आणि विद्यार्थी मेटाकुटीस आले आहेत.
शेतकरीही अडचणीत
यंदा डिसेंबरपर्यंत मान्सूनने मेहेरबानी केली आहे. त्यामुळे रब्बीतील गहू, ज्वारी, मका, हरभरा आदी पिके चांगली आली आहेत. त्याच्या वाढीसाठी पिकांना पाणी देणे आवश्यक असतानाही भारनियमन व खंडित वीजपुरवठ्यामुळे ते देता येत नसल्याने शेतकरी रडकुंडीला आले आहेत. शेतात पाणी असूनही विजेअभावी उत्पादनात घटण्याची भीती शेतक-यांना सतावत आहे.
राज्यात वीज मागणीचा चढता आलेख
गेल्या काही दिवसांतील विजेची मागणी
० 3 जानेवारी 14 हजार 500 मेगावॅट
० 5 जानेवारी 16 हजार 57 मेगावॅट
० 14 जानेवारी 16 हजार 283 मेगावॅट
० 16 जाने. 16 हजार 100 मेगावॅट .
का वाढली विजेची मागणी ?
कृषिपंप आणि उद्योगाला अधिक वीज लागत आहे. याचबरोबर घरगुती, व्यावसायिक मागणीही वाढली आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत गेल्या पंधरा दिवसांत दोन हजार मेगावॅटपेक्षा अधिक वाढ झाली आहे.
भारनियमन नसतानाही वीजपुरवठा खंडित केला जातो
यंदा पाऊस चांगला झाला. विहिरी, तलावांत रब्बीची पिके येतील एवढे पाणी उपलब्ध आहे. पण ते देण्यासाठी वीज नाही. 14 ते 16 तास भारनियमन केले जाते. भारनियमन नसतानाही विजेचा लपंडाव सुरू असतो. शेतक-यांचे नुकसान होत असूनही ते राजकर्त्यांना दिसू नये, ही खेदाची बाब आहे. किमान काही तास तरी सुरळीत वीज मिळावी.
सिकंदर जाधव, शेतकरी, जळगाव फेरण