आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नो व्हेइकल डे अभियान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पेट्रोल-डिझेलच्या वाढत चाललेल्या किमती आणि पर्यावरणाचा र्‍हास याकडे सर्वांचे लक्ष वेधले जावे. या प्रश्नाबद्दल मोठय़ा स्तरावर जनजागृती व्हावी, यासाठी ‘दिव्य मराठी’-इंजिनिअरिंग यूथ कम्युनिटी संघटनेने एक ऑक्टोबरला ‘नो व्हेइकल डे’ अभियान हाती घेतले आहे. त्यास औरंगाबादकरांनी मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद देण्याची तयारी सुरू केली आहे. जागरूक नागरिक, संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

या अभियानाचे वृत्त प्रसिद्ध होताच अनेक जागरूक नागरिकांनी त्याचे स्वागत केले. आम्हीही जागरूक आहोत. इंधन दरवाढीच्या समस्येने आम्हीही होरपळत आहोत. त्यामुळे या अभियानात सहभागी होण्याची मनापासून तयारी केली असल्याचे चिकलठाणा येथील रहिवासी ज्ञानेश्वर बकाल यांनी सांगितले. माझ्यासोबत चिकलठाणा भागातील किमान पाच नागरिकांना एक ऑक्टोबर रोजी सार्वजनिक वाहनातून प्रवासासाठी तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश साबळे म्हणाले की, हे अभियान औरंगाबादकरांसाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळेच आम्ही सहभागी होणार आहोत. आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी एक ऑक्टोबरला वाहन वापरणार नाही. आम्ही सायकलीचा वापर करणार आहोत. महालक्ष्मी ट्रॅव्हल्सचे मदनलाल पाटणी म्हणाले की, आमचे कर्मचारीही स्वत:चे वाहन वापरणार नाहीत. शिवाय सार्वजनिक वाहतुकीसाठी आमची वाहने उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. इच्छुकांनी दिव्य मराठीत श्रीकांत सराफ (9881300821) प्रा. शिंदे (8793969708) यांच्याशी संपर्क साधावा.