आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारनियमनाने पाणीपुरवठा ठप्प, लोकांना पिण्याचे पाणीही मिळेना; खोेटे कोण? महावितरण की मनपा?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या तीन दिवसांपासून शहरातील ६७ फीडरवर आठ ते दहा तास भारनियमन केले जात आहे. त्यामुळे चार दिवसांआड येणारे पिण्याचे पाणीही लोकांना भरता येत नसल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. महावितरणने किमान पाणीपुरवठ्याच्या वेळेत तरी भारनियमन करू नये, असा आग्रह केला जात असतानाच कमी दाबाचे कारण सांगून महावितरण भारनियमनाचे वेळापत्रक बदलायला तयार नाही. 

उलट विजेच्या उपलब्धतेच्या वेळेतच महापालिकेने पाणीपुरवठा करावा, असे सांगत त्यांनी भारनियमनाचे वेळापत्रक महापालिकेकडे सोपवले आणि त्यानुसार नियोजन करण्याचा सल्लाही दिला. शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत एकेकाळी मनपाचे आयुक्त राहिलेले महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया आणि महापालिका दोघेही एकमेकांकडे बोटे दाखवत जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे शहरवासीयांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. वीजगळती जास्त असल्यामुळे औरंगाबादेत भारनियमन होत आहे, असे महावितरणकडून सांगितले जात आहे. 
 
त्याबाबत बकोरिया यांना ‘वितरण वाणिज्यिक हानी कामी करण्याचे काम कुणाचे?’ असे विचारले असता हे काम आमचेच आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत हजार मेगावॅट विजेचा तूट निर्माण झाल्याने राज्यभर भारनियमनाचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. ‘दीडशे कोटींवर खर्चाचा ड्रम प्रकल्प राबवूनही अखंडित वीज का मिळत नाही?’ या प्रश्नावर बकोरिया यांनी ड्रम प्रकल्प जेथे राबवला तेथील किती फीडरवर भारनियमन सुरू आहे, हे मला आताच सांगता येणार नाही, असे म्हणत हात झटकले. 
 
पाणीपुरवठ्याच्या वेळेत तरी भारनियमन होऊ नये, म्हणून आम्ही महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर आणि मनपाचे पाणीपुरवठा सरताजसिंग चहल यांना थेट सवाल केले. ते असे... 
प्रश्न : ‘पाणीपुरवठ्याच्या वेळेस वीज सुरू का ठेवत नाही? 
बकोरिया: मनपाशीसंपर्क साधला. त्यांच्याकडून वेळापत्रक मागितले. मात्र, ते त्यांनी दिले नाही. 
 
प्रश्न: महावितरणने वेळापत्रक मागितले आहे का? 
चहल: होय.त्यांनी वेळापत्रक मागितले. ते आम्ही त्यांना कालच (मंगळवारी) दिलेही. 
 
प्रश्न: मनपाने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक दिले का? 
गणेशकर: नाही. उलट मीच त्यांना आज पत्र पाठवून भारनियमनाच्या वेळेऐवजी विजेच्या उपलब्धतेतच पाणीपुरवठा करण्याची विनंती केली आहे.
बातम्या आणखी आहेत...