औरंगाबाद - ध्वनिप्रदूषणाच्या बाबतीत औरंगाबाद शहर घातक वळणावर पोहोचले असून शहराच्या गजबजलेल्या भागात नागरिकांच्या आरोग्याला घातक असलेल्या पातळीपर्यंत ध्वनिप्रदूषण पोहोचले आहे. आदर्श ध्वनिपातळीपेक्षा ३० ते ४० डेसिबल्स अधिक हे प्रमाण असून अशा वातावरणात सतत आठ तास राहाणा-यांवर ठार बहिरे होण्याची वेळ येण्याची भीती आहे.
महानगरपालिकेने शहराचा पर्यावरण स्थिती अहवाल तयार केला असून आज तो महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रकाशित करण्यात आला. या अहवालात धक्कादायक बाबी समोर आल्या असून ध्वनिपातळी आता असह्य होण्याच्या दिशेने जात असल्याचे समोर आले आहे.
गुलमंडी असो की सिडको बसस्टँड, बाबा पेट्रोलपंप असो की वाळूज कोठेही गेले तरी दुपारी बारा ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांना या घातक ध्वनिप्रदूषणातच राहावे लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दिवसा कमाल ध्वनी मर्यादा ४५ डेसिबल्स असायला हवी, तर रात्रीच्या वेळी हे प्रमाण ३५ डेसिबल्स असावे. ८० डेसिबल्सच्या वरील ध्वनिपातळी मानवी आरोग्याला घातक आहे.
ध्वनिप्रदूषणाचा धोका
ध्वनिप्रदूषणामुळे श्रवणक्षमता कमी होणे, चिडचिड वाढणे, ताण वाढणे, ब्लडप्रेशर वाढणे, पॅनिक अॅटॅक यासारखे त्रास होऊ शकतात.
ही आहेत ध्वनिप्रदूषणाची कारणे
सर्वात मोठे कारण आहे वाढलेली वाहनांची संख्या, कर्णकटू हॉर्न, कारखाने, दणदणाटी आवाजात साजरे केले जाणारे कार्यक्रम, उत्सव, बांधकामाच्या ठिकाणी वापरल्या जाणा-या यंत्रसामग्रीचा आवाज, जनरेटरचा आवाज या बाबी ध्वनिप्रदूषण वाढवतात.
सर्वाधिक ध्वनिप्रदूषित भाग
गुलमंडी चौक, सिमेन्स चौक वाळूज, सिडको बसस्टँड, बाबा पेट्रोल पंप या ठिकाणची ध्वनिपातळी मोजण्यात आली आणि त्यातून धक्कादायक चित्र समोर आले. या चारही ठिकाणी ध्वनिपातळी असह्य असल्याचे समोर आले आहे.
गुलमंडी फक्त रात्री शांत : शहराचे हृदय असलेल्या गुलमंडीवर सतत वर्दळ व वाहनांची गर्दी असते. बाजारपेठेमुळे या भागात कायम गर्दी असते. पण संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास तेथील ध्वनिपातळी बहिरेपण आणण्याच्या पातळीपर्यंत पोहोचते. या काळात तेथील पातळी ८८.४ असते. दुपारी १२ वाजेच्या सुमारासही ८० डेसिबल्सचे ध्वनी या भागात दणाणत असतात. पहाटे तीन ते सहा हाच काळ ध्वनिपातळी खूप सुसह्य असते. गुलमंडी सकाळी ९ वाजेनंतर ७० डेसिबल्सच्या वर जाते ती रात्री ९ वाजेपर्यंत.
सिडको बसस्टँडही धोकादायक ; सिडको बसस्टँडचा परिसर वाहनांमुळे सर्वाधिक ध्वनिप्रदूषण असणा-या भागांत मोडतो. येथे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ८०.२ डेसिबल्सची ध्वनिपातळी गाठलेली असते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास ती ८० डेसिबल्सची असते. रात्री दहा वाजेपर्यंत ही पातळी ७२ डेसिबल्सची असते. नंतर ती कमी होते पण ६० डेसिबल्सच्या खाली येत नाही. पहाटे सर्वात कमी ५१ डेसिबल्सची नोंद करण्यात आली आहे.
बाबा पेट्रोलपंपदेखील घातक : शहराचे प्रवेशद्वार असणारा बाबा पेट्रोल पंप कर्कशपणात आघाडीवर आहे. येथेही ध्वनीची पातळी दुपारी तीन वाजेनंतर ८० डेसिबल्सच्या वर पोहोचते. दिवसभरात फक्त पहाटे ५० ते ५८ डेसिबल्सपर्यंत ती असते.
सिमेन्स चौकसुद्धा तसाच : औद्योगिक वसाहत असलेल्या वाळूजच्या सिमेन्स चौकात गुलमंडीएवढेच ध्वनिप्रदूषण आहे. तेथे दुपारी तीन ते रात्री ९ पर्यंत ध्वनिपातळी ८० डेसिबल्सची मर्यादा पार करते. सायंकाळी ६ च्या सुमारास तर ती ८८ डेसिबल्सपर्यंत पोहोचते.
प्रथमच केला अहवाल
मनपाने प्रथमच शहराचा पर्यावरण स्थिती अहवाल प्रकाशित केला आहे. त्यात शहरातील प्रदूषणाचे भयावह चित्र समोर आले असून आताच जागे होण्याची वेळ आल्याचे निष्कर्षांवरून स्पष्ट जाणवते.
यांनी केला अहवाल : औरंगाबाद महापालिकेने हा अहवाल तयार करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मदत घेतली. थ्री टेक ग्रीन सोल्यूशन्स या पर्यावरणविषय सल्लागार संस्थेने माहिती गोळा करून त्याच्या विश्लेषणात मोठी मदत केली.
मराठीवरून अहवाल परत
आज सर्वसाधारण सभेत औरंगाबादचा पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल व सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाचा मास्टर प्लॅन प्रकाशित करण्यात आला. हे दोन्ही अहवाल प्रकाशित करण्यासाठी पदाधिकारी व नगरसेवक महापौरांच्या आसनाकडे धावले. हातात प्रती धरून फोटो सेशनही झाले. पण नंतर पाहातात तो हे दोन्ही अहवाल इंग्रजीत. त्यामुळे नगरसेवक संतापले. मराठीत अहवाल द्या अशी मागणी करीत त्यांनी
आपापल्या हातातील प्रती महापौरांकडे परत केल्या. त्यांनीही लवकरच मराठी प्रती देऊ असे जाहीर केले. या वेळी स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे यांनी तर इंग्रजीत कशाला अहवाल देता, समांतरच्या करारासारखे करायचे आहे का असे थेट विचारले.