आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरापासून ‘एनए’च्या 300 फायली धूळ खात पडून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी पदभार घेतल्यापासून भूखंड अकृषक (एन.ए.) करण्याच्या जवळपास 300 फायलींवर स्वाक्षरी करण्यास आखडता हात घेतला आहे. गेल्या महिन्याभरापासून त्यांनी एकही फाइल पुढे ढकलली नाही. त्यातच मालमत्ताधारकांनी स्वत:च सर्व नाहरकत प्रमाणपत्र सादर करण्याचा नाशिक पॅटर्न येथे राबवण्याची घोषणा केली. एक जूनपासून याची अंमलबजावणी होणार होती, परंतु सोमवारपासून (1 जुलै) हा पॅर्टन सुरू झाल्याचे विक्रमकुमार यांनी सांगितले.

एन. ए. परवानगी मिळत नसल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांची ओरड सुरू होती. त्यातच एन.ए. परवानगी देण्याची येथील पद्धती वेळकाढूपणाची असल्याने गतिमान नाशिक पॅटर्न लागू करण्याची घोषणा विक्रमकुमार यांनी एप्रिल महिन्यात केली होती. एक जूनपासून ही पद्धत लागू होणार असल्याचे त्यांनी बांधकाम व्यावसायिकांसोबत बैठक घेतल्यानंतर स्पष्ट केले होते. त्यामुळे नवीन फायली या काळात जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाल्या नाहीत. जुन्या फायलीही तशाच पडून आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या काळात जिल्हा प्रशासनाकडून एकही फाइल मंजूर करण्यात आलेली नाही. पूर्वीच दाखल झालेली फाइल कशामुळे पडून आहे, याची विचारणा केली तर प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे देण्यात येत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

बांधकामांना फटका
सातारा, देवळाई, पडेगाव, मिटमिटा, हर्सूल आदी भागांतील कृषक जमिनी अकृष करून तेथे वसाहती निर्माण होत आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी तशी परवानगी देण्यास हात आखडता घेतल्याने या भागात नवीन बांधकामे सुरू होऊ शकले नाही. एन. ए.शिवाय कर्जही मिळत नाही. यामुळे परिसरातील विकास यामुळे काहीसा मंदावला असल्याचे दिसत आहे. पावसाळा सुरू झाल्याने आता बांधकाम करण्याचा मानस असताना एन.ए. मिळत नसल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. तर दुष्काळाच्या काळात बांधकामे होणे शक्य नव्हते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

सात दिवसांमध्ये फाइल हातावेगळी
दुष्काळी कामासाठी प्रारंभी वेळ नव्हता. 1 जूनपासून नाशिक पॅटर्न सुरू करण्याचे ठरले होते. मात्र, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम यांची बदली झाली. नवीन अधिकारी आल्याने त्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून 1 जुलैपासून हा पॅटर्न राबवण्याचे ठरले. सर्व नाहरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर जास्तीत जास्त सात दिवसांच्या आत फाइल हातावेगळी केली जाईल.
-विक्रमकुमार, जिल्हाधिकारी.

फाइल प्रलंबित ठेवू नये
नाशिक पॅटर्न चांगला आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत केले. जास्त काळ फाइल प्रलंबित ठेवण्यापेक्षा ती मंजूर की नामंजूर हे लवकर स्पष्ट व्हावे ही अपेक्षा आहे.
-प्रमोद खैरनार, माजी अध्यक्ष, क्रेडाई.