आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ : वसतिगृहातच ठाण मांडणाऱ्या पुराणपुरुषांचे बस्तान हलवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अभ्यासक्रमपूर्ण झाल्यानंतर वर्षानुवर्षे वसतिगृहातच ठाण मांडणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचे बस्तान हलवण्यासाठी विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे यांनी मोहीम हाती घेतली आहे. पीएच.डी., एम.फिल. च्या नावाखाली वर्षानुवर्षे वसतिगृहांच्या खोल्या ताब्यात ठेवणाऱ्यांना हॉस्टेल सोडण्याची सक्ती केली असून त्याचबरोबर विद्यापीठ कॅम्पसच्या बाहेरचे गाइड असलेल्यांनाही हॉस्टेल सोडावे लागणार आहे.

विद्यापीठ परिसरात एकूण हजार २०० जणांना हॉस्टेलमध्ये राहण्याची सुविधा हवी आहे. पण मुला-मुलींच्या एकूण ११ हॉस्टेलमध्ये फक्त १०५० जणांना राहता येईल, अशी व्यवस्था असून त्यापेक्षा अधिक संख्येने विद्यार्थी सध्या वसतिगृहात राहत आहेत. एम.फिल. करणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त वर्षभरच वसतिगृहात राहण्याची परवानगी आहे, पण तीन सत्रांच्या या अभ्यासक्रमासाठी आणखी सहा महिने राहण्याची परवानगी विद्यापीठ प्रशासनाकडून दिली जाते. त्याशिवाय वर्षभर ठाण मांडून बसणाऱ्यांची संख्या जवळपास २४ आहे. पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियमानुसार दोन वर्षे हॉस्टेल फॅसिलिटी दिली जाते, पण गाइडच्या परवानगीने आणखी वर्षभर राहण्याची मुभा आहे. असे असले तरीही चार ते पाच वर्षांपासून पीएच.डी. संशोधनाच्या नावाखाली जवळपास २६ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ठाण मांडल्याचे डॉ. मोराळे यांच्या निदर्शनास आले आहे. त्यांनाही हॉस्टेल सोडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शिवाय पीएच.डी. संशोधन करणाऱ्या २२ विद्यार्थिनी आणि १२ विद्यार्थ्यांचे संशोधक मार्गदर्शक या विद्यापीठाशी संबंधित नसल्यामुळे त्यांनीही ३४ खोल्यांवर ताबा ठेवलेला आहे. पीएच.डी. हॉस्टेलच्या जागा कमी असल्यामुळे नव्याने पीएच.डी. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश सुकर व्हावा म्हणून डॉ. मोराळे यांनी मोहीम हाती घेतली आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याही निदर्शनास आणून दिले असून त्यांनी डॉ. मोराळे यांना मुदतीपेक्षा अधिक काळ वास्तव्यास असणाऱ्यांना बस्तान उठवण्याचे सुचवले आहे.

उच्च न्यायालयात विद्यार्थी पराभूत
शिक्षणशास्त्र विभागात एम.फिल. करणारा हनुमंत गुट्टे अनधिकृतपणे वसतिगृहात राहत असल्याची विद्यापीठ प्रशासनाची तक्रार होती. मुदतीपेक्षा जास्त वर्षे राहूनही त्याने वसतिगृह सोडल्याने विद्यापीठाने बळाचा वापर करून त्याला काढले. त्यामुळे संतापलेल्या गुट्टेने विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने मात्र त्याचीच खरडपट्टी काढून याचिका फेटाळली.

नव्या विद्यार्थ्यांचे अर्ज आले
नव्या प्रवेशाच्या विद्यार्थ्यांना आपण किती दिवस वेटिंगवर ठेवणार आहोत..? त्यांना त्वरित हॉस्टेल उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. त्यामुळे बाहेरच्या गाइडकडे संशोधन करणारे विद्यार्थी, विहित मुदतीत संशोधन केलेले विद्यार्थी तसेच अनधिकृतपणे खोल्या अडवून ठेवणाऱ्यांना त्वरित हॉस्टेल सोडण्यास सांगितले आहे. नव्यांना संधी मिळावी, हीच त्यामागील भूमिका आहे. डॉ.सुहास मोराळे, विद्यार्थी कल्याण संचालक
बातम्या आणखी आहेत...