आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकही डॉक्टर प्रिस्क्रिप्शनवर लिहीत नाही जेनेरिक औषधी; विक्रेत्यांचा थेट आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने वर्षभरापूर्वीच डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर जेनेरिक औषधी लिहून द्यावीत, असे आदेश दिले होते. पण औषधी कंपन्यांकडून मिळणाऱ्या भेटवस्तू, परदेश सहलींच्या मोहात अडकलेले डॉक्टर त्याचे पालन करत नाहीत. औरंगाबादेतील एकही डॉक्टर जेनेरिक औषधी लिहून देत नाही, असे प्रत्युत्तर औषधी विक्रेत्यांनी दिले.
 
आयएमएच्या (इंडियन मेडिकल असोसिएशन) औरंगाबाद शाखेचे सचिव डॉ. संतोष रंजलकर यांनी असे म्हटले होते की, आम्ही डॉक्टर औषधींची जेनेरिक नावे लिहूनही देऊ; पण दुकानात ती उपलब्ध नसल्यास औषधी दुकानदार रुग्णांना ब्रँडेड आणि ज्यात अधिक मार्जिन मिळेल अशी औषधे देतील. म्हणजे आम्ही वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या लोकांनी बंधनात राहायचे अन् फक्त औषधीचा एक विषय शिकलेल्यांनी लोणी खायचे, असा हा प्रकार आहे, असेही त्यांचे म्हणणे होते. 

त्यावर औषधी विक्रेत्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. औरंगाबाद ड्रगिस्ट अँँड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर म्हणाले की, डॉक्टरच औषधांपोटी रुग्णांची लूट करतात. भेटवस्तू, परदेश सहलींचा खर्च कंपन्या रुग्णांच्या खिशातून काढतात. तर असोसिएशनचे कोशाध्यक्ष दिनेश सेठी म्हणाले की, डॉक्टरांनी जेनेरिक अौषधी लिहून द्यावीत, असे पंतप्रधानांनी सांगितल्यावर त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी औषधी विक्रेत्यांना यातून कसा फायदा होतो. कंपन्या कसा नफा लाटतात, याकडे बोट दाखवण्यात डॉक्टर धन्यता मानत आहेत. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनचे मराठवाडा समन्वयक मनोहर कोरे यांनी तर ‘एखाद्या रुग्णाने विचारणा केली तर घ्यायचे तर जेनेरिक घ्या, पण काही झाल्यास आम्ही जबाबदार नाही’ अशी भीती डॉक्टर दाखवतात, असा आरोप केला. 

डॉक्टर तपासणी शुल्काची पावती देतात का? 
आम्ही औषधाची पावती देतो. पण, डॉक्टर कधी रुग्णांना तपासणी शुल्काची पावती देतात का? असा सवाल औषधी विक्रेते शेखर गाडे यांनी केला. ते म्हणाले की, आमच्यावर मात्र प्रत्येक गोष्टीच्या नोंदीचे बंधन आहे. ड्रग अॅण्ड कॉस्मेटिक अॅक्ट १९४५ च्या कलम ६५/१२/ए नुसार डॉक्टरांनी जी औषधी लिहिली आहे तीच आम्हाला द्यावी लागतात. तरीही आम्ही लूट कशी करू शकतो, याचे उत्तर डॉक्टरांनी द्यावे.
बातम्या आणखी आहेत...