आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Behave Like Owner, Otherwise File Crime Municipal Commissioner

मालकासारखे वागू नका, गुन्हे नोंदवीन - आयुक्त समांतरच्या अधिकाऱ्यांवर कडाडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको एन-७ जलकुंभाच्या प्रवेशद्वारावर व्हॉल्व्हच्या दुरुस्तीसाठी सहा फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे. या परिसरात जाण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांना असा गेटचा आधार घेऊन पुढे जावे लागले. छाया : माजेद खान
औरंगाबाद - समांतरच्या कामावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणाऱ्या मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संतापाचा आज कडेलोट झाला. सहा दिवस पाणी नसतानाही टँकर देणाऱ्या समांतरला आज त्यांनी निर्वाणीचाच इशारा दिला. तुम्ही ठेकेदार आहात, मालक असल्यासारखे वागू नका, पाण्याचा प्रश्न आहे, त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तुम्हाला जबाबदार धरेन आणि तुमच्यावर गुन्हे नोंदवेन, याद राखा, अशा शब्दांत त्यांनी सोमवारी रात्री समांतरच्या अधिकाऱ्यांना सुनावले. यासोबतच दुर्लक्ष करणाऱ्या मनपाच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी धारेवर धरले.
तीन दिवसांपासून व्हाॅल्व्ह बदलण्यात येत नसल्याने एन-७ च्या पाण्याच्या टाकीवर सिडकोतील नगरसेवकांनी दुपारपासून ठिय्या दिला होता. सायंकाळपर्यंत ते काम होत नव्हते. उपमहापौरांनी आयुक्त केंद्रेकरांच्या कानावर ही बाब टाकल्यावर त्यांनी थेट टाकीकडे धाव घेतली समांतरचे प्रकल्प प्रमुख सोनल खुराणा शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनाही पाचारण केले. आयुक्त येत असल्याची माहिती कळताच सिडको-हडकोतील पाणीपीडित नगरसेवकही तेथे दाखल झाले. सहा दिवसांपासून पाणी नाही, उद्याची खात्री नाही, मागणी करून टँकर नाही, फोन केले तर समांतरचे अधिकारी फोन घेत नाहीत, घेतलेच तर दुरुत्तरे करतात, अशा तक्रारींची सरबत्ती होताच आयुक्त केंद्रेकरांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

ढिसाळपणा चालणार नाही
समांतरच्याअधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देतानाच ढिसाळपणा सहन करणार नाही, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर गुन्हे नोंदवीन, असा सज्जड दमही भरला. दुसरीकडे पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मनपाच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी चांगलेच धारेवर धरले. यापुढे पाण्याच्या सगळ्या तक्रारी, प्रश्न मला रोज कळलेच पाहिजेत, असा आदेशच त्यांनी दिला.

ज्या भागात पाणी नाही त्या भागात आतापासून टँकर सुरू करा, ३०-४० टँकर काय लागतील तेवढे मागवा पाणी द्या, असे सांगतानाच त्यांनी पानझडे कोल्हे यांना सगळे ज्युनियर इंजिनिअर बोलवा आणि टँकरचे काम सुरळीत करा. आज तुमचा मुक्काम इथेच राहील. मी चार तासांनी फोन करून माहिती घेईन, असेही आयुक्तांनी ठणकावले. सुमारे पाऊण तास आयुक्तांनी समांतर मनपाच्या अधिकाऱ्यांना अत्यंत कठोर शब्दांत सुनावत यापुढे पाण्याची तक्रार येता कामा नये, असा दमच भरला. या वेळी उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, नगरसेवक नितीन चित्ते, राज वानखेडे, सीताराम सुरे, बन्सीधर जाधव, किशोर नागरे, अशोक वळसे, राहुल रोजतकर आदींची उपस्थिती होती.
पालिका अधिकाऱ्यांना उद्देशून
>हे लोक काम करतात की नाही यावर लक्ष ठेवणे हे तुमचे काम आहे. तुम्हाला अधिकार आहेत. लाचारासारखे केविलवाणे वागू नका.
>कंपनीच्या लोकांकडून कामे होत नाहीत हे लक्षात आल्यावर तुम्ही माझ्याकडे का आला नाहीत? तुमची सिस्टिम नाही का?
>तीन-तीनदिवस हा प्रश्न सुटत नाही, मग तुम्ही काय केले? हे मी सहन करणार नाही, सांगून ठेवतो. सस्पेंड करीन.
>आज उपमहापौरांनी मला सांगितले नसते तर मला हा विषय कळलाच नसता. यापुढे मला छोट्यातल्या छोट्या गळतीपासून पाण्याचा कोणताही प्रश्न आला की माहिती मिळालीच पाहिजे. रोज मला सविस्तर रिपोर्ट आला पाहिजे. नाही आला तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात घ्या.
>मीआता पाणीपुरवठ्याकडे जरा अधिक बारकाईने बघणार आहे. एन-७ च्या टाकीच्या काय तक्रारी आहेत ते बघतो, या टाकीवर विशेष लक्ष देतो.
>पाणी, ड्रेनेज ही तुमची कामे आहेत हो. मला त्यातच अडकवून ठेवू नका. कमिशनरचा सॅनिटरी इन्स्पेक्टर करून टाकलाय. काही तरी १५०-२०० कोटींच्या मोठ्या प्रस्तावांचे बघा, त्यात माझी ताकद वापरा. हे काय आहे?
>मलाकाम पाहिजे. सिस्टिम लावा. जमत नसेल तर राजीनामा द्या. राजीनामा द्या म्हणालो की तुम्हाला वाईटही वाटते पुन्हा. असे कसे चालेल?

समांतर अधिकाऱ्यांना उद्देशून
>माझ्या नोटिसीच्या उत्तरात तुम्ही म्हणालात ना की, मी तुम्हाला शटडाऊनला परवानगी देत नाही म्हणून कामे होत नाहीत. आता तारखेला शटडाऊन दिला तर काय केले? सगळा पुरवठा ठप्प करून टाकला तुम्ही.
>तुम्ही अतिशय बेजबाबदार काम करत आहात. पाण्याचे नियोजन नाही, कुणी ऐकत नाही, हे थांबवा.
>तुम्ही मालक असल्यासारखे वागू नका, तुम्ही फक्त ठेकेदार आहात. आम्ही सांगू ते झालेच पाहिजे. गुन्हे दाखल करीन.
>तुम्हाला एवढी कशाची मस्ती आहे? तुमची मस्ती मी उतरवू शकतो. सहा दिवस पाणी नाही तर टँकर देणे तुमची जबाबदारी आहे.
>१३ लाख नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न आहे. रस्त्यासारखे आज नाही तर उद्या चालणार नाही. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तुम्हीच जबाबदार असाल, याद राखा.
>इथल्या टाकीचे काम कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे? तो फोन घेत नाही, बोलत नाही. कशाला पोसता अशी माणसे? त्याला उद्या काढा. नाही तर मी लेखी देईन.
>एवढेमोठे काम आहे तर देखभाल-दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग आणून ठेवता येत नाहीत? मीदेखील इंजिनिअर आहे. मला सांगू नका. काहीही करा, सुटे भाग आणून ठेवा.
>आत्ताच ३० ते ४० टँकर मागवा, कुठून आणायचे ते तुम्हीच पाहा. पण जिथे पाणी गेले नाही त्यांना टँकर गेलेच पाहिजे.