कन्नड - एसबीआय बँकेच्या बचत खात्यातून परस्पर हडप केलेली रक्कम कन्नड व औरंगाबादच्या मुख्य शाखेत असंख्य चकरा मारूनही मिळाली नाही. त्यामुळे हताश झालेल्या सेवानिवृत्त कामगाराचा गुरुवारी (१३ ऑगस्ट) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृत्यूची बातमी कळताच संतप्त जमावाने बँक अधिकाऱ्याला चोप दिला.
मृत्यूनंतर बँक अधिकाऱ्याने हडप केलेली रक्कम २० दिवसांत परत करण्याचे लेखी अाश्वासन दिले. कन्नड सहकारी साखर कारखान्यातील कर्मचारी शंकर गायकवाड (६०, रा. भिलपलटण) यांना सेवानिवृतीनंतर चार लाख रुपये मिळाले होते. त्यातील काही रक्कम कुटुंबातील विवाह समारंभासाठी खर्च केली. उर्वरित पावणेदोन लाख रुपये कन्नडच्या एसबीआय बँकेत नोव्हेंबर २०११ मध्ये जमा केले होते. त्यानंतर बँकेत एक हजार रुपये निवृत्तिवेतन नियमित जमा होत होते. ते १० जून २०१५ रोजी बँकेत रक्कम काढण्यासाठी गेले असता, खात्यावर १४ हजार रुपये शिल्लक असल्याचे आढळून आल्याने ते अचंबित झाले. तेव्हापासून ते बँकेत चकरा मारत होते.
आश्वासनानंतर अंत्यसंस्कार
अखेर खडबडून जाग आलेले बँक अधिकारी औरंगाबादहून कन्नड पोलिस स्टेशनला आले. त्यांनी सदरील रक्कम मृताच्या बचत खात्यावर जमा करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला. त्यानंतर शंकर गायकवाड यांच्या पार्थिवावर शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.