आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुटेपर्यंत ताणू नका; दांगटांचा सल्ला! मनपा आयुक्त बकोरिया हटाव मोहिमेला गती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काल बकोरियांनी सर्वसाधारण सभेचा अवमान केला, अशी तक्रार महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्याकडे केली होती. हे शिष्टमंडळ दालनातून बाहेर पडल्यावर डॉ. दांगट यांनी बकोरियांशी संपर्क साधला. लोकशाहीत असे प्रकार घडतच असतात. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे किती ताणायचे तुम्ही ठरवा. तुटेपर्यंत ताणू नका, असा सल्ला त्यांनी बकोरियांना दिला. तो मान्य करूनच अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना बकोरियांनी सभेसाठी पाठवले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत’ या वाक्यामुळे सभात्याग करणारे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना हटवण्यासाठी शिवसेनेचे दोन पदाधिकारी कोकणात पालकमंत्री रामदास कदम यांच्या दरबारात दाखल झाले. भाजपचे काही पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे भोकरदनला दिवसभर तळ ठोकून होते. बकोरिया सकाळी ग्राहक पंचायत पथकाच्या दौऱ्यात आणि नंतर मौलाना आझाद संशोधन केंद्रात अधिकाऱ्यांच्या बैठकीत गुंतले होते. दरम्यान, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी बकोरिया यांना तुटेपर्यंत ताणू नका, असा सल्ला दिला आहे.

राठोड भोकरदन मुक्कामी : उपमहापौर प्रमोद राठोड प्रदेशाध्यक्ष दानवेंसोबत दिवसभर भोकरदनलाच होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जनानंतर आयुक्तांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी विशेष सभा बोलावली जाऊ शकते. आठ महिन्यांपूर्वीच निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांना याच पदाधिकाऱ्यांनी शासनसेवेत परत पाठवले होते. बकोरिया यांच्याविरोधात युतीसह एमआयएम हा प्रमुख विरोधी पक्षही असल्याने बकोरियांना परत पाठवण्याचा प्रस्तावही सहज मंजूर होईल, अशी चिन्हे आहेत.

शासनाला काय सांगायचे?
दुसरीकडेआठ महिन्यांत दुसऱ्यांदा आयुक्त परत पाठवण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यास तुमच्याकडे कोण अधिकारी द्यायचा, असा सवाल अधिकाऱ्यांसह मंत्र्यांकडून होईल. तेव्हा काय उत्तर द्यायचे, असा ज्येष्ठ नगरसेवकांपुढील प्रश्न आहे.

उस्मापुऱ्यात वाद
उत्सवमंगल कार्यालयासमोर खड्ड्यात काळी माती टाकण्यावर जागरूक नागरिकांनी आक्षेप घेतला. ही माती विसर्जनापर्यंत तरी राहील का? असा प्रश्न त्यांनी विचारला तेव्हा वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करतो. काय तक्रार करायची ती त्यांच्याकडेच करा, असे उत्तर कर्मचाऱ्याने दिल्याने वाद झाला.

व्हाइट टॉपिंगची बैठक दुसऱ्यांदा रद्द
विभागीयआयुक्तालयात बुधवारी होणारी व्हाइट टॉपिंग रस्त्यांसंदर्भातील बैठक पुन्हा रद्द झाली. जिल्हाधिकारी निधी पांडेेंऐवजी उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके बैठकीला आले होते. मात्र, मनपा आयुक्त आल्याने गुरुवारी दुपारी तीन वाजता बैठक घेण्याचे ठरले.

सेनेचे शिष्टमंडळ आज बकोरियांना भेटणार
एकीकडे शिवसेनेचे पदाधिकारी बकोरियांना हटवण्याच्या तयारीत असताना नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ गुरुवारी त्यांना भेटणार आहे. जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शहरप्रमुख राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, संतोष जेजूरकर, महिला संघटक सुनीता आऊलवार यांच्यासह उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, इतर पदाधिकारी सकाळी दहा वाजता बकोरियांना भेटणार आहे.
खड्ड्यांत ओतली माती
खड्ड्यांसंदर्भातीलसभा मंगळवारी तहकूब झाल्यानंतर बुधवारी सकाळपासून गणेश विसर्जन मार्गावरील खड्ड्यांत माती मुरूम ओतण्याचे काम सुरू झाले. हेडगेवार रुग्णालय, निराला बाजार, भडकल गेट ते सिटी चौक, उत्सव मंगल कार्यालयासमोर तसेच अमरप्रीत हॉटेल ते शहानूरवाडी रस्त्यांवर हे काम झाले. त्यातही विवेकानंद चौकात बांधकाम साहित्याचा चुरा, लाल मातीचा ढिगारा टाकण्यात आला. हेडगेवार रुग्णालयासमोर मुरूम कमी आणि दगड जास्त होते. त्यावर रोड रोलर फिरवला नाही. काही खड्डे तसेच सोडून देण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले. यासंदर्भात आयुक्त, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, सिकंदर अली यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
महापौर, जंजाळ पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी कोकणात !
गणेशोत्सवासाठीपालकमंत्री त्यांच्या मूळ गावी खेड येथे गेले आहेत. कालच्या सभेनंतर सेना पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; तेव्हा त्यांच्या स्वीय सहायकाने ते पाच दिवसांचे गणपती संपल्यानंतरच उपलब्ध होतील, असे सांगितले. त्यामुळे महापौर त्र्यंबक तुपे, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ खेडकडे रवाना झाले. दिव्य मराठी प्रतिनिधीने संपर्क साधला तेव्हा तुपेंनी ‘मी देवदर्शन,’ तर जंजाळांनी रायगड सहलीचे कारण सांगितले.
बातम्या आणखी आहेत...