आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रख्यात उर्दू गझलकार बशर नवाज यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जानतेहैं कि वहाँ कोई नहीं,
फिर भी उस राह से अक्सर गुजरे
अब कोई गम कोई याद 'बशर’
वक्त गुजरे भी तो क्यूं कर गुजरे?
अशी मन:स्थिती तमाम गझलप्रेमींची झाली आहे. कारण गुलाम अली यांनी गायलेली ही भावस्पर्शी गझल ज्यांनी लिहिली, ते प्रख्यात उर्दू शायर, गझलकार बशर्रत नवाज खान अमीर नवाज खान ऊर्फ बशर नवाज (८०) यांचे गुरुवारी सकाळी ज्युबिली कॉम्प्लेक्स येथील राहत्या घरी निधन झाले. १९८०च्या दशकातील ‘बाजार’ चित्रपटातील ‘करोगे याद तो हर बात याद आएगी’ या गीताने नवाज उत्तुंग उंचीवर पोहोचले. हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पश्चात भाऊ, बहिणी, मुली, मुले असा परिवार आहे.

औरंगाबादेत १८ ऑगस्ट १९३५ रोजी जन्मलेले बशर नवाज ६० च्या दशकात उर्दू साहित्य क्षितिजावर आपल्या गझलेमुळे चमकले. धर्माच्या भिंती तोडून माणुसकीचा धर्म सांगणा-या बशर यांनी १९५४ मध्ये गझललेखन सुरू केले. याच काळात औरंगाबादमध्ये झालेल्या अ.भा. उर्दू मुशाय-यात त्यांनी पहिली गझल सादर केली. त्यानंतर अनेक नियतकालिकांत त्यांच्या गझला प्रसिद्ध होऊ लागल्या. पहिला गझलसंग्रह ‘राहेगाँ' १९७२ मध्ये आला.

"नया अदब-नये मसायल’ हे त्यांचे समीक्षापर लेखांचे पुस्तक १९७३ मध्ये प्रकाशित झाले. आजही उर्दू साहित्यातील महत्त्वाचे पुस्तक म्हणून त्याचा उल्लेख होतो. १९९८ मध्ये त्यांचा "अजनबी समंदर' हा संग्रह वाचकप्रिय झाला होता. बशर यांची गझल उत्तरोत्तर अधिक थेट आणि रसिकप्रिय झाली होती. २००८ मध्ये प्रकाशित झालेल्या "करोगे याद तो' या गझलसंग्रहाने अनेक विक्रम मोडले होते. साहित्य अकादमीनेही त्यांचा गौरव केला होता.

रसिक वाचकांच्या मनात दीर्घकाळ राज्य करणा-या अनेक गझल बशर नवाज यांनी दिल्या. दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या "अमिर खुस्रो' या मालिकेचे लेखन त्यांनी केले होते. याशिवाय आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठीही मोठ्या प्रमाणात लेखन केले. त्यांच्या गझलेचा इंग्रजी, पंजाबी, कन्नड आणि मराठीतही अनुवाद झाला आहे. भारतातच नाही, तर पाकिस्तानातील साहित्यातही त्यांचे चाहते आहेत. अशा या दिलदार व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने उर्दू साहित्याची मोठी हानी झाली आहे.
बशर नवाज यांचा परिचय -
- जन्म : १८ ऑगस्ट १९३५
- १९५२ मध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
- बाजार, लोरी, जाने-वफा, तेरे शहर में, शंकर खान आदी चित्रपटांसाठी गीतलेखन.
- मराठी, इंग्रजी, पंजाबी, गुजराती, कानडी अाणि अन्य भाषांमध्ये त्यांच्या गझल आणि नज्मचे अनुवाद प्रकाशित झाले आहेत.
- शॉर्ट हिस्ट्री ऑफ उर्दू लिटरेचरमध्ये त्यांचा प्रामुख्याने उल्लेख आहे.
- दूरदर्शन सिरियल "अमिर खुस्रो’च्या १३ भागांचे लेखन त्यांनी केले होते.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील टीव्ही वृत्तपटाचे संहिता लेखन.
- ‘ऑल इंडिया रेडिओ’चा संगीतमय कार्यक्रम "सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा'साठी २६ भाग आणि जवळपास ६० नभोनाट्यांचे लेखन त्यांनी केले.
- दिल्ली, पंजाब, उस्मानिया, मुंबई आदी विद्यापीठांतील परिसंवादात त्यांनी प्रबंधवाचन केले.
- श्री सरस्वती शिक्षण संस्था हीरक महोत्सवात अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले होते.
- दिल्ली साहित्य अकादमीच्या वतीने "मीट ऑथर’ या विशेष कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
- पहिली ते पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतच्या सर्व उर्दू पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांच्या गझल आणि कवितांचा समावेश आहे.
- मानाचा गालिब पुरस्कार, महाराष्ट्र उर्दू साहित्यासाठीचा फक्र महाराष्ट्र, उर्दू अकादमी आणि गालिब अकादमीचा पुरस्कार.