आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍या मल्टिप्लेक्सना कायदेशीर नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मल्टिप्लेक्समध्ये वाजवण्यात येणारे राष्ट्रगीताचे रिमिक्स बंद करावे यासाठी हिंदू जनजागरण समितीने तीव्र आंदोलन छेडले आहे. डीबी स्टारने याबाबत वृत्त प्रकाशित करताच समितीने वकिलांमार्फत शहरातील पाच मल्टिप्लेक्सना कायदेशीर नोटिसा बजावल्या. नियमबाह्य पद्धतीने राष्ट्रगीत तातडीने बंद न केल्यास खटला दाखल करण्याचा इशारा त्यात देण्यात आला आहे. यासोबतच समितीने जिल्हाधिकारी आणि पोलिस उपायुक्तांना निवेदन देऊन मल्टिप्लेक्स चालकांवर गुन्हे नोंदवण्याची मागणी केली आहे.


देशभरातील मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात देशभक्तीचे प्रतीक असणार्‍या राष्ट्रगीताचे रिमिक्स वाजवून त्याची विटंबना सुरू होती. डीबी स्टारने याबाबत स्वातंत्र्यदिनाच्या दोन दिवसांपूर्वी 13 ऑगस्ट रोजी ‘मल्टिप्लेक्समध्ये राष्ट्रगीताचे रिमिक्स’ हे वृत्त प्रकाशित केले. त्यावर देशभक्त नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मंगळवारी 13 ऑगस्ट रोजी हिंदू जनजागरण समितीच्या एका शिष्टमंडळाने पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍या मल्टिप्लेक्सवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.


काय म्हणतात समिती सदस्य
हा तर राष्ट्रगीताचा अवमान
राष्ट्रगीताचा अवमान म्हणजे राष्ट्रदोह असल्याचे समितीचे औरंगाबादचे कार्यकर्ते ऋषीकेश देवडीकर यांनी म्हटले आहे. याप्रकरणी समितीने ई-स्क्वेअर, बिग सिनेमा, पीव्हीआर, सत्यम सिनेप्लेक्स आणि फेम या मल्टिप्लेक्सना कायदेशीर नोटीस बजावली आहे.


जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
कोणत्याही परिस्थितीत पारंपरिक आणि मान्यताप्राप्त 52 सेकंदांचे राष्ट्रगीतच वाजवले जावे, असे समितीने जिल्हाधिकार्‍यांना सांगितले.


तत्काळ कारवाई करावी
राष्ट्रगीताचा अवमान हा राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान प्रतिबंधक अधिनियम 1971 नुसार मोठा गुन्हा आहे. चुकीचे किंवा रिमिक्स पद्धतीने राष्ट्रगीत गाणार्‍यांवर शासनाने गुन्हे दाखल करावेत.
सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य समन्वयक, हिंदू जनजागरण समिती, पनवेल


पाठपुरावा करणार
डीबी स्टारने वृत्त प्रकाशित केल्यामुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला. मल्टिप्लेक्समध्ये अशा चुकीच्या पद्धतीने राष्ट्रगीत गायले जात असेल तर नवीन पिढीवर तसेच संस्कार होतील. यामुळे हे रिमिक्स बंद होणे गरजेचे आहे. आम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करू.
ऋषीकेश देवडीकर, औरंगाबाद


आता प्रशासनाची जबाबदारी
आम्ही पोलिस आणि जिल्हाधिकार्‍यांना हा प्रकार सांगितला. आता पुढे त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी याप्रकरणी कठोर कारवाई करून आपली जबाबदारी पार पाडावी.आमचे आंदोलन सुरूच राहील.
अशोक कुलकर्णी, अधिवक्ता, हिंदू जनजागरण समिती