आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिट्टी वाजली अन् पोलिसांच्या घेरावातून पसार झाला कल्ल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अनेक दिवसांपासून पोलिसांना हवा असणारा कुख्यात दरोडेखोर कल्ल्याने गुरुवारी पहाटे पुन्हा पोलिसांना चकवा दिला. अधिकारी ३० कर्मचाऱ्यांनी घराला घेराव घातलेला असताना ऐनवेळी खुणेची "शिट्टी’वाजताचपत्रे उचकटून पसार होण्यात कल्ल्या यशस्वी झाला.
गुन्हे शाखेचे कर्मचारी कल्ल्या ऊर्फ कलीम खान शब्बीर खान (३२, रा. छोटा मुरलीधर नगर) याच्या शोधात होते. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल दरोडेखोर असून त्याला पकडण्यासाठी यापूर्वी आखलेल्या योजना फोल ठरल्या आहेत. गुरुवारी पहाटे झालेल्या कारवाईत सहभागी अधिकाऱ्यांपैकी काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा गुन्हे शाखेत कल्ल्याला पकडण्याची योजना निश्चित झाली. पहाटे चार वाजता कल्ल्या घरात असतानाच त्याला पकडण्याचे यात ठरले. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक प्रशांत आव्हारे, विजय जाधव, विजय पवार यांच्यासह गुन्हे शाखेचे २० कर्मचारी, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतिश टाक त्यांचे १० कर्मचारी छोटा मुरलीधरनगरात दाखल झाले. उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे कर्मचारी गणवेशात तर गुन्हे शाखेचे कर्मचारी साध्या वेशात होते. कल्ल्याच्या घराला चहुबाजूने घेराव घालण्यात आला. पथकातील एका कर्मचाऱ्याने कल्ल्याच्या घराचा दरवाजा ठोठावला. परंतु, या मोहिमेची माहिती आधीच मिळाल्याने पोलिस दरवाजा उघडण्याची वाट पाहत असतानाच घराचे पत्रे उचकटून कल्ल्या पसार झाला. रेल्वे ट्रॅककडे पळालेल्या कल्ल्याचा कर्मचाऱ्यांनी पाठलागही केला. परंतु, हा प्रयत्नही निष्फळ ठरला. त्याने पोलिसांना गुंगारा देण्याची ही तिसरी वेळ होती. दोन ते तीन आठवड्यांपूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ दरोड्याच्या तयारीतील आरोपीला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. त्या वेळी कल्ल्या टॉम हे आरोपी पसार झाले होते.

४० पेक्षा जास्त गुन्हे; मोक्कातील गुन्हेगार
कल्ल्या हा रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगार असून दोन महिन्यांपूर्वीच तो मोक्कातील शिक्षेतून बाहेर आला होता. त्याच्यावर ४० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. याआधीही तीन वेळा पोलिसांना गुंगारा देण्यात तो यशस्वी ठरला आहे.

पथकातील कर्मचारी कल्ल्याच्या घराला घेराव घालत असताना या घराशेजारी लघुशंकेसाठी बसलेल्या एका व्यक्तीला ही बाब समजली. आत लपलेल्या कल्ल्याला ही माहिती देण्यासाठी त्याने शिट्टी वाजवली अन् कल्ल्याने धूम ठोकली. यानंतर त्या व्यक्तीला पथकाने झोडपून काढले.
बातम्या आणखी आहेत...