आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्च तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिल्या सर्व कुलगुरूंना सूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राजभवनातील जेबीव्हीसी म्हणजेच जॉइंट बोर्ड ऑफ व्हाइस चान्सलरची बैठक वगळता कुलगुरूंनी मुंबईत यापुढे कुठल्याही बैठकांना येण्याची गरज नाही. त्यासाठी एका अधिकाऱ्याला समन्वयक नेमून त्यांनाच बैठकांना पाठवा. शिवाय सर्व कुलगुरूंचा व्हॉट्सअॅपवर ग्रुप करावा, अशा सूचना उच्चतंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी मंगळवारी (७ जुलै) पत्रकारांना दिली आहे.

कुलगुरूंचा वेळ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्यांनी संशोधन आणि उच्चशिक्षणातील गुणवत्तेसाठी अधिक वेळ विद्यापीठातच राहावे. तावडेंच्या सूचनेचे पालन करत प्रभारी कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांची समन्वयक म्हणून नेमणूक केल्याचे कुलगुरूंनी जाहीर केले. शिवाय राज्यातील सर्व विद्यापीठांचे अकॅडमिक कॅलेंडर आता समान राहणार आहे. प्रत्येक विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया, परीक्षा, निकाल जाहीर होण्याच्या तारखा समान राहतील, असा प्रयत्न उच्चशिक्षण विभाग करणार आहे. प्रादेशिक विद्यापीठांचे राज्यातील सर्व कुलगुरूंनी व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार करून ऐकमेकांशी संपर्कात राहण्याचे तावडेंंनी सांगितले. केंद्राच्या रुसा म्हणजेच राष्ट्रीय उच्चशिक्षा अभियानाअंतर्गत देशातील ‘ए’ ग्रेडप्राप्त विद्यापीठ आणि महाविद्यालयांना ३०० कोटी रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे. त्यामध्ये येथील विद्यापीठाचाही समावेश आहे. इंडो-जर्मन कंपनीसोबत विद्यापीठाचा सामंजस्य करार झाल्याचेही कुलगुरू म्हणाले.

मतदार यादीत ७,७७८ जणांची नोंदणी
विद्यापीठाचानवीन कायदा डिसेंबर अखेरीस मंजूर होईल, पण तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांच्या निवडणुकांची तयारी पूर्ण करून ठेवली जाईल, असेही कुलगुरूंनी पत्रकारांना सांगितले. आतापर्यंत ७,७७८ जणांनी विविध प्रवर्गातील मतदार यादीत नावे नोंदवली आहेत. त्यामध्ये प्राचार्यांच्या प्रवर्गासाठी २३७ जणांनी यादीत नावे नोंदवली आहेत. संस्थाचालकांसाठी २९५, अभ्यास मंडळासाठी २६८३, पदव्युत्तर शिक्षक ५९१, तर पदवी प्राप्त ३९७२ शिक्षकांनीही नावे नोंदवली आहेत.