आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांकडून आंबे थेट ग्राहकांपर्यंत, मेमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शहरातील काही तरुणांच्या कल्पकतेतून चांगला उपक्रम राबवला जात आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतातील आंबे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या तरुणांनी पुढील महिन्यात 'औरंगाबाद आंबा महोत्सवा’चे आयोजन केले आहे. यात शेतकऱ्यांना विनामूल्य सहभागी होता येईल. शेतकऱ्यांच्या मालाची अधिकाधिक विक्री व्हावी यासाठी 'आंबे खा, आंबे मिळवा' या स्पर्धेचे अायोजनही केले जाणार आहे.

समाजाप्रति संवेदना जिवंत असणाऱ्या तरुणांचा समूह म्हणजे शुभारंभ ग्रुप. यातील काही तरुण नोकरी, तर काही व्यवसाय आणि सांस्कृतिक कला क्षेत्रात कार्यरत आहेत. मराठवाड्यातील दुष्काळामुळे हे तरुण व्यथित झाले. शेतकऱ्यांना रोख मदत करणे शक्य नसले तरी किमान त्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करू, या हेतूने त्यांना औरंगाबाद आंबा महोत्सवाची कल्पना सुचली. त्यांनी पुढील महिन्यात ते ११ मे या पाच दिवसांत उस्मानपुऱ्यातील कलश मंगल कार्यालयात या महोत्सवाचे अायोजन केले आहे. यात एकूण ३२ स्टॉल, तर १० टेबल असतील. सहभागी शेतकऱ्यांना हे स्टॉल मोफत मिळतील.

शेतकऱ्यांना पर्वणी ठरणार
आंबा महोत्सवामुळे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. यातून आंब्यापासून गृहउद्योग करणाऱ्यांनाही फायदा होणार आहे. दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा आमचा खारीचा वाटा आहे. -चेतन पवार, आयोजक,आंबा महोत्सव, शुभारंभ ग्रुप

पोटपूजेचा आनंद
प्रदर्शनात विविध जातींचे अांबे असतील. खवय्यांना आंब्यापासून तयार पदार्थ जसे कैरी, लोणचे, अंबा वडी, रस पोळी, आइस्क्रीम, ज्यूसचा आनंद लुटता येईल. महोत्सवाचे आकर्षण म्हणजे आंबे खाण्याची स्पर्धा असेल. १० मे रोजी ही स्पर्धा होईल. विविध जातींचे आंबे स्पर्धकांना खाण्यासाठी दिले जातील. कमी वेळेत पाच आंबे खाणाऱ्यास डझनभर आंबे बक्षीस मिळतील. अशा स्पर्धांतून जास्तीत जास्त ग्राहक प्रदर्शनात आकर्षित होतील, असे संयोजकांना वाटते. महोत्सवासाठी शुभारंभ ग्रुपचे निखिल भालेराव, चेतन पवार आणि संदीप पाटील प्रयत्न करत आहेत.