आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजिस्ट्री कार्यालयातील गर्दी संपणार; डिजिटल स्वाक्षरी करणार काम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - खरेदी-विक्रीचा व्यवहार पक्का झाला की त्यापेक्षा मोठी चिंता असते ती रजिस्ट्री व्यवहार पूर्ण करण्याची. पंधरा मिनिटांच्या व्यवहारासाठी चार दिवस रांगा लावा, पैसे मोजूनही दलाल, कर्मचार्‍यांची मनधरणी करा हा प्रकार यापुढे कायमचा बंद होणार आहे. कारण ऑनलाइन रजिस्ट्रीची तयारी मुद्रांक शुल्क विभागाने सुरू केली असून येत्या काही महिन्यांत तुम्ही घरातील संगणकावर बसून आपला व्यवहार पूर्ण करू शकाल.


यासाठी नागरिकांनी फक्त काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. खरेदीदार आणि विक्रीकर्ता हे दोघे संगणकावर मुद्रांक शुल्क विभागाने उपलब्ध करून दिलेला अर्ज भरून देतील. त्यावर दोघांचीही डिजिटल स्वाक्षरी करून तो अर्ज ऑनलाइन पद्धतीने मुद्रांक शुल्क विभागाच्या उपनिबंधकांकडे पाठवता येणार आहे. रेडीरेकनरच्या दराने मुद्रांक शुल्क किती हे उपनिबंधक तुम्हाला ऑनलाइनच कळवेल. ते शुल्क मुद्रांक शुल्क विभागाच्या बँक खात्यावर जमा केले की तुमचा व्यवहार पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र ऑनलाइनच मिळणार आहे. स्वप्नवत वाटणारे हे चित्र येत्या काही दिवसांत प्रत्यक्षात आलेले असेल अन् सध्या कायम गर्दीचे कार्यालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या रजिस्ट्री कार्यालयात तेथील कर्मचारी आणि संगणकांशिवाय दुसरे कोणी असणार नाही.


अशी असेल प्रक्रिया
खरेदीदार अन् विक्रेता दोघे ऑनलाइन अर्ज डाऊनलोड करून तो मुद्रांक शुल्क विभागाला पाठवतील. त्यात मालमत्तेचे विवरण असेल. दोघांच्या डिजिटल स्वाक्षर्‍या त्यावर असतील. यासाठी आधारचीही मदत घेतली जाईल. रेडीरेकनरनुसार मुद्रांक शुल्क किती हे निबंधक कार्यालय व्यवहारकर्त्यांना कळवेल. त्यांनी मुद्रांक शुल्क ऑनलाइन पद्धतीने विभागाच्या बँक खात्यावर जमा केले की त्यांचा व्यवहार पूर्ण होईल. दोघांनाही रजिस्ट्रीची साक्षांकित प्रत डाऊनलोड करता येईल.

दलाली बंद
रजिस्ट्री कार्यालय म्हटले की दलालांचा सुळसुळाट डोळ्यासमोर येतो. ऑनलाइन व्यवहार झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याचीच वेळ येणार नसल्यामुळे दलाली बंद होईल. त्यामुळे येथील दलालांना अन्य कार्यालये शोधावी लागतील.

काही मिनिटांत व्यवहार
सध्या ऑनलाइन फॉर्म भरला जातो, पण रजिस्ट्रीसाठी कार्यालयात यावे लागते. रजिस्ट्री ऑनलाइन करण्याची कार्यालयीन प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही महिन्यांत ती अस्तित्वात येईल. त्यानंतर रजिस्ट्रीसाठी कार्यालयात येण्याची कोणाला गरज पडणार नाही. अवघ्या काही मिनिटांत घरबसल्या व्यवहार करता येतील. वाय. डी. डामसे, जिल्हा निबंधक, मुद्रांक शुल्क विभाग, औरंगाबाद.