आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Now Eat The Ethilin Using Fruits : Foods And Drugs Administration Department

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता खा इथिलिनने पिकवलेली फळे : अन्न व औषध प्रशासन विभाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आहारात फळांचा समावेश अतिशय महत्त्वाचा आहे. रसायनांनी पिकवलेली फळे आरोग्यास घातक ठरत आहेत. तेव्हा नैसर्गिक किंवा इथिलिनचा वापर करून पिकवलेल्या फळांचाच स्वाद घ्यावा. कॅल्शियम कार्बाइडचा वापर टाळा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांनी केले.

कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने फळ विक्रेत्यांसाठी इथिलिनने फळे कसे पिकवावीत याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अन्न तंत्र, केमिकल टेक्नॉलॉजी विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. भगवान साखळे, ग्रीन टेक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक गणेश कुलकर्णी, चंद्रशेखर मुजमुले, मिलिंद शेवलीकर, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एम. डी. शहा, अन्न सुरक्षा अधिकारी एस. डी. तेरकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना सोळुंके म्हणाले, कायद्याने कार्बाइडने फळे पिकवता येत नाहीत, पण व्यापारी अज्ञानामुळे फळे पिकवण्याच्या चांगल्या पद्धती बाजूला ठेवून आरोग्यावर दुष्परिणाम करणारी रसायने वापरत आहेत. हा प्रकार थांबायला हवा. व्यापार्‍यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

इथिलिन गॅस नैसर्गिकरीत्या मिळत असून त्याचा वापर फळे पिकवण्यासाठी करावा, असे आवाहन सोळुंके यांनी केले. नैसर्गिक पद्धतीसारखी दुसरी पद्धती नाही. मात्र, व्यापारी फळे पिकवण्यासाठी कार्बाइडचा सर्रास वापर करत आहेत. त्यामुळे कॅन्सर, अल्सर, दमा आदींसारखे गंभीर आजार होतात, अशी चिंता गणेश कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

फळ विक्रेते गोडाऊनमध्ये ठेवलेल्या फळांच्या खाली कॅल्शियम कार्बाइडची पुडी ठेवतात. एक किलो कॅल्शियम कार्बाइडमध्ये 200 किलो फळे 15 तासांत आकर्षक होतात, मात्र ते पिकत नाहीत. कॅल्शियम कार्बाइडचा संबंध पाण्याशी असल्यामुळे अँसिटिलिन गॅस (हा गॅस वेल्डिंगसाठी वापरतात) तयार होऊन त्याची फळांवर रासायनिक प्रक्रिया होते. या प्रक्रियेपासून फळांचा रंग बदलतो, पण आम्लतेचे प्रमाण कमी होते. साखरेचे प्रमाण वाढते. अशी कृत्रिमरीत्या पिकवलेली फळे आरोग्यास घातक असतात, असे डॉ. साखळे यांनी सांगितले.


फळे पिकवण्याच्या तीन पद्धती
नैसर्गिक प्रक्रिया
फळे पिकवण्याची सर्वोत्तम पद्धती आहे. ही फळे खाण्यासाठी चवदार आणि मऊ असतात. आरोग्यास हानिकारक नसतात. फळे पिकण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. यासाठी कोणताही खर्च येत नाही. फक्त या पद्धतीला वेळ जास्त लागतो.
कार्बाइडचा वापर करणार नाही
कार्बाइड रसायन ग्राहकांच्या आणि आमच्याही आरोग्यासाठी किती घातक आहे याची माहिती आज कार्यशाळेतून मिळाली. आजपासून कार्बाइडद्वारे फळे पिकवणार नाही तसेच फळ विक्रेत्यांनीही पिकवून विकू नये यासाठी प्रयत्न करणार आहे. ग्राहकांनीदेखील अशी पिकवलेली फळे खरेदी करू नयेत. इथिलिनद्वारे फळे पिकवणेदेखील खर्चीक बाब आहे. नैसर्गिकरीत्या सर्वोत्तम पद्धती आहे. या दोन पद्धतींचा आम्ही वापर करून ग्राहकांना स्वादिष्ट फळे देण्याचा प्रयत्न करू. युसूफ चौधरी, अध्यक्ष, मराठवाडा फळ भाजीपाला असोसिएशन
इथिलिन गॅस
इथिलिन नैसर्गिक गॅस आहे. त्याचे लिक्विड, कॉम्प्रेसर गॅस आणि सिलिंडर गॅसमध्ये रूपांतर केले जाते. सिलिंडर गॅसमध्ये 95 टक्के नायट्रोजन आणि 5 टक्केच इथिलिन असते. फळे पिकवण्यासाठी रायपनिंग चेंबर करावे लागते, ज्यामध्ये फळे पिकवण्यासाठी लागणारे योग्य तापमान, हवेतील आद्र्रता आणि इथिलिनचे योग्य प्रमाण नियंत्रित केले जाते. त्यामुळे फळे पिकून खाण्यासाठी चवदार होतात.
रसायनांचा वापर
कार्बाइडच्या वापरामुळे उष्णता, कॉर्बन डायऑक्साइड जास्त तयार होते. यामुळे अँसिटिलिन गॅस तयार होतो. यामुळे फळांचे लवकर विघटन होऊन फळे पिकतात. या रसायनाद्वारे पिकवलेल्या फळांचा रंग पिवळागर्द आणि आकर्षक असतो. ही फळे अर्धवट पिकलेली असतात. फळाचा गंध लसणासारखा येतो. 5 ते 6 दिवसांत फळे पिकतात. कार्बाइड खरेदी करण्याची परवानगी नाही.