आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Now Jalna Nagarsol Shuttle Railway Go For Diseal To The Manmad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जालना -नगरसोल शटल रेल्वेगाडी आता डिझेलसाठी जाणार मनमाडला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - केवळ डिझेल भरण्यासाठी जालना -नगरसोल शटल रेल्वेगाडी (डेमू) पूर्णा येथे 318 कि.मी.चा अकारण फेरा मारायची. रेल्वे प्रशासनाच्या या नियोजनशून्यतेमुळे वर्षभर 56 लाख रुपये खर्च झाले. ‘दिव्य मराठी’ने फेब्रुवारीत या प्रकाराकडे लक्ष वेधताच खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने या गाडीमध्ये मनमाड येथे इंधन भरण्याचा निर्णय घेतला. येत्या 3 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होणार असून, दरवर्षी 56 लाख रुपयांची बचत होणार आहे. रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल हे दोन दिवसांच्या खासगी दौ-यावर असतानाच हा निर्णय घेण्यात आला, हे विशेष.


मनमाड स्थानकात डिझेल भरण्याची परवानगी शटलला मिळाल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद मुख्यालयाकडून नांदेडला कळवण्यात आले आहे. वर्षभरात (मार्च 2012 ते 31 मार्च 2013) शटलच्या डिझेलवर 56 लाख 35 हजार 951.60 रुपये अनावश्यक खर्च झाला. वर्षभरापासून सुरू असलेल्या रेल्वेच्या तुघलकी कारभारासंबंधीचे वृत्त दैनिक ‘दिव्य मराठी’ने 7 फेब्रुवारी 2013 रोजी प्रसिद्ध क ेले होते. त्याची दखल घेत आम्ही कार्यवाही केली, असे रेल्वे विभागाने आज (29 मार्च) स्पष्ट केले.


नांदेड विभागाचा पुढाकार : औरंगाबाद आणि जालना येथील चाकरमान्यांच्या सोयीसाठी ही शटल सुरू करण्यात आली आहे. इंधन भरणे मनमाड येथे सोयीचे असल्याने शटलचा पल्ला केवळ 25 किमीने मनमाडपर्यंत वाढवण्याची गरज होती. परंतु हा निर्णय घेण्यास रेल्वेला वर्ष लागले. इंधनबचतीचे धोरण केंद्र व राज्य सरकारने जाहीर केले असले तरी केवळ दोन झोनमधील समन्वयाअभावी वर्षभर हजारो लिटर डिझेल वाया गेले आणि अनाठायी खर्चही झाला. ‘दिव्य मराठी’ने हे लक्षात आणून दिल्यानंतर नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.एस. सोईन यांनी सिकंदराबादला पाठपुरावा केला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक (भुसावळ) महेशकुमार गुप्ता यांनाही मनमाड येथे डिझेल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली.


चार दिवसांनंतर अंमलबजावणी
सिकंदराबाद कंट्रोल रूमवरून विभागीय कार्यालय नांदेड येथे संदेश प्राप्त झाल्याचे विभागीय मेकॅनिकल इंजिनिअर एम. प्रसाद यांनी शुक्रवारी (29 मार्च) औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर विभागीय व्यवस्थापक सोईन यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. असाच संदेश डीआरएम भुसावळला दोन दिवसांत प्राप्त होईल. 3 एप्रिलपासून शटल मनमाड येथे डिझेल भरणार आहे. सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 या काळात शटलला मनमाड येथे डिझेल भरण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली जाईल, असे प्रसाद यांनी सांगितले.


शटलच्या वेळा : आठवड्यातून सहा दिवस शटल धावते. जालना येथून सकाळी 5.45 वाजता निघणारी शटल सकाळी 7 वाजता औरंगाबादला व सकाळी 9 वा. नगरसोलला पोहोचते. नगरसोलहून सायंकाळी 5.45 वा. निघून औरंगाबाद सायंकाळी 7.20 व जालना येथे 8.40 वा. पोहोचते. जालना-नगरसोल-जालना असे 302 कि. मी. अंतर धावते.

वर्षात धावली शटल : 2012 मध्ये मार्च-12 दिवस, एप्रिल-25, मे ते ऑगस्ट प्रत्येकी 26 दिवस, सप्टेंबर-25, ऑक्टोबर -नोव्हेंबर प्रत्येकी 26, डिसेंबर 25. जानेवारी (2013) -26, फेब्रुवारी 24, मार्च 26.


नियोजित प्रवासावरील डिझेलचा खर्च :
जालना ते नगरसोलअंतर (ये-जा) : 302 कि.मी.
वर्षाला शटल धावली : 96388 कि.मी.
वर्षाला डिझेल : 96388 लिटर
वर्षाला डिझेल खर्च : 53 लाख 66 हजार 990 रुपये.
नियोजित प्रवास व अनावश्यक असा एकूण खर्च : 1 कोटी 38 लाख 41 हजार 922.60 रुपये.
318 किमीचा फेरा टळला, 56 लाखांची बचत


वर्षातील उधळपट्टीचा लेखाजोखा
०मार्च 2012 ते 31 मार्च 2013 : 1 लाख 804 कि.मी.
०लागलेले एकूण डिझेल : 1 लाख 804 लिटर.
०एकूण खर्च (प्रति लि. 55 रु. प्रमाणे) : 56 लाख
०आठवड्यातून एकदा स्वच्छतेसाठी मौलाली प्रवास : 910 कि.मी.
०शटल स्वच्छतेसाठी गेली : 56 आठवडे
०मौलालीपर्यंत एकूण अंतर : 50960 किमी डिझेल : 50960 लि.
०स्वच्छतेसाठी खर्च : 28 लाख 38 हजार 981 रुपये
‘दिव्य मराठीने उलगडा केला’
‘दिव्य मराठी’ने चांगला विषय आमच्या लक्षात आणून दिल्याचे सोईन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यासाठी आपण सिकंदराबाद व भुसावळ येथील मध्य रेल्वेच्या डीआरएमशी संपर्कात होतो. मनमाडला इंधन भरण्याची सुविधा दिल्यास नगरसोलला दिवसभर उभी असलेली शटल महसूलही मिळवेल, असे पटवून देण्यात आले. परंतु मनमाडला जागा नसल्याने शक्य होत नसल्याचे उत्तर मिळाले. सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 दरम्यान शटल इंधन भरेल व अनावश्यक खर्चाला फाटा देण्यात येईल.


एकूण अनावश्यक डिझेल खर्च : 84 लाख 74 हजार 932.60 रु.
डेमूच्या (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल इंजिन) 700 हॉर्स पॉवरच्या इंजिनला प्रति कि. मी. 1 लिटर डिझेल लागते. प्रवासी क्षमता 1136 आहे. आठ डबे, दोन्ही बाजूंनी इंजिन.


कशी होईल बचत
जालना ते पूर्णा 318 कि.मी. अंतराची प्रतिदिन बचत होईल व वर्षाकाठी यासाठी डिझेलवर होणा-या 56 लाख 35 हजार 951 रुपयांच्या अनावश्यक खर्चाची बचत होईल.
धुलाईसाठी रेल्वेला मौलाली येथेच जावे लागेल. शटलच्या देखभाल-दुरुस्तीची सुविधा केवळ मौलालीतच असल्याचे सोईन यांनी सांगितले. मनमाडला अशी सुविधा नसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे धुलाईचा वार्षिक खर्च सहन करावाच लागेल.


मध्य रेल्वेचे नरो वा कुंजरो वा!

जालना-नगरसोल शटलला मनमाड येथे इंधन भरण्यासंबंधी आदेश आले की नाही यासंबंधी मी काहीच सांगू शकत नाही. मी मागील चार दिवसांपासून रजेवर होतो. त्यामुळे नांदेड विभागास काय संदेश प्राप्त झाला हे सांगता येणार नाही. या सर्व प्रकरणाचा अभ्यास करीत आहे. संपूर्ण तपासणी झाल्यानंतर यावर बोलता येईल.’
महेशकुमार गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे भुसावळ


कधी सुरू झाली शटल
18 मार्च 2012 रोजी जालना ते नगरसोल
किती दिवस धावली
31 मार्च 2013 पर्यंत 319 दिवस


पुढे काय ?
जालना-नगरसोल शटलचा पल्ला मनमाडपर्यंत वाढवल्याने दररोज 50 कि.मी. अंतर अतिरिक्त जावे लागेल. यामुळे वर्षाला 15 हजार 950 कि. मी. अंतर व इतकेच लिटर (15950 लि.) डिझेल लागेल. यावर 8 लाख 88 हजार 574. 50 रुपये खर्च होतील. परंतु नगरसोल-मनमाडदरम्यान प्रवासी वाहतूकही शक्य होईल व महसूल मिळेल.