आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदींनी कर बुडवलेलाच नाही, शरद पवार मैदानात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आयपीएलचे घोटाळेबाज माजी कमिशनर ललित मोदी यांच्या बाजूने शनिवारी मैदानात उतरले. ललित मोदी यांनी कुठलाही कर बुडवलेला नाही, असे सांगत पवारांनी केंद्र सरकारचे मंत्रीच काय, मोदींना मीही लंडनमध्ये भेटलो. त्यांना भारतात येऊन सर्व खटल्यांना सामोरे जाऊन स्वत:ला निष्कलंक म्हणून सिद्ध करा, असा सल्लाही दिल्याचे सांगत ते निर्दोष होतील, असा दावाही केला.

एमजीएम अभिमत विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे व केंद्र सरकारने ललित मोदींना केलेल्या मदतीत काहीच गैर नाही. मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना मोदी उपाध्यक्ष होते. त्यांच्या कल्पनेतूनच आयपीएल सुरू झाले. मीही त्यासाठी पुढाकार घेतला होता. ललित मोदींनी कर बुडवल्याच्या नुसत्या वावड्याच आहेत. लंडनमध्ये मी त्यांची भेट घेतली होेती. भारतात येऊन सर्व खटल्यांना सामोरे जा व स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करा, असा सल्ला मी त्यांना दिला होता, असे पवार म्हणाले.

भाजप नेतृत्वाला न भेटताच वसुंधरा जयपूरला परतल्या
ललित मोदींच्या स्थलांतर शपथपत्रावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केल्याने वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी ना पंतप्रधानांची भेट घेतली ना भाजप अध्यक्षांची. त्यावर काहूर उठल्यावर दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीतील एवढाच कार्यक्रम होता, असा खुलासा त्यांच्या कार्यालयाने केला.

माेदींचा राजधर्म नव्हे, राजेधर्म : काँग्रेस
पंतप्रधान राजेधर्म आणि ललितधर्माचे पालन करत आहेत, राजधर्माचे नव्हे. भ्रष्टाचार होऊ देणार नाही, असे मोदींनी म्हटले होते. मात्र आता काळा पैसावालेच चौकीदार बनले आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.