आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता पालकांच्याही हातात पुस्तके हवीत - हेरंब कुलकर्णी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांच्याही हातात पुस्तके यायला हवीत. त्यांच्या हातात पुस्तक आले, तर आपोआप मुलांच्या हातात येतील. यामुळे वाचन संस्कृती जोपासता येईल. आचार-विचार घडवता येतील, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ आणि शाळाबाह्य मुलांचे अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनी केले.

स. भु. महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या ग्रंथ महोत्सवात 'शिक्षक, पालकांनी काय वाचावे?' या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. कुलकर्णी यांनी 'नीलची शाळा, टीचर्स, प्लॅटफॉर्म' आदी पुस्तकांचे दाखले देत पुस्तकांमधून कशी प्रेरणा मिळते आणि आयुष्य संस्कारक्षम कसे घडवता येऊ शकते, हे पटवून दिले. विद्यार्थी विकासासाठी कोणतेही प्रयोग राबवण्याकरिता अनुदानाची नव्हे, तर प्रायोगिक शिक्षण देण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षकांमध्ये समर्पणाची भावना असायला हवी. प्रगतिपुस्तकातील गुणांमध्ये मुलांचे भविष्य शोधण्यापेक्षा त्यांच्या सुप्त गुणांना वाव देत पालकांनी मनोवस्था समजून घेणे आवश्यक असल्याचेही कुलकर्णींनी सांगितले. हेरंब कुलकर्णी लिखित 'बखर शिक्षणाची' पुस्तकाचे प्रकाशन ऐश्वर्या कुलकर्णी यांनी केले. या वेळी राजहंस प्रकाशनाचे श्याम देशपांडे, जनशक्ती वाचक चळवळीचे श्रीकांत उमरीकर उपस्थित होते.