आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांमध्ये आता ‘पॅरेंट्स कॉर्नर’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मोबाइल आणि इंटरनेटच्या वाढत्या जाळ्यामुळे संपर्क व्यवस्था जलद व सुटसुटीत झाली आहे. हीच बाब लक्षात घेऊन शहरातील शाळांमध्ये पालकांसाठी दिल्या जाणार्‍या सूचनांसाठी वापरण्यात येणार्‍या विद्यार्थ्यांच्या वहीला सुटी देण्यात आली आहे. आता ही जागा मोबाइल एसएमएस, ई-मेलने घेतली आहे.

आतापर्यंत महाविद्यालयीन स्तरावरच प्रवेश प्रक्रिया असेल किंवा परीक्षेसंदर्भातील माहिती, मोबाइलवर एस.एम.एस. करून दिली जात असे. हीच सुविधा आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांबरोबरच मराठी माध्यमांच्या शाळांमध्येही सुरू करण्यात आली आहे. शाळेत साजरे केले जाणारे विविध दिनविशेष, वार्षिक स्नेहसंमेलने, पालक सभा किंवा परीक्षेचे वेळापत्रक. अशी सर्व माहिती विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही असावी यासाठी वर्षानुवष्रे वहीतच संदेश देण्यात येत होता. तो आता हायटेक पद्धतीने करण्यात येत आहे. कारण वहीत दिलेली सूचना ही पालकांपर्यंत पोहोचेलच याची शाश्वती राहत नाही.

बर्‍याच वेळा शाळेतून घरी जाईपर्यंत विद्यार्थी देखील विसरून जातात. तसेच नोकरी करणार्‍या पालकांना माहिती मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर शहरातील शाळांमध्ये स्वत:चे संकेतस्थळ निर्माण करण्यात आले असून एसएमएस बरोबरच ई-मेलवरही सूचना देण्याचा उपक्रम शाळांमध्ये सुरू करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या सूचना
आपला मुलगा- मुलगी शाळेत जातोय, पण तो काय करतोय. त्याच्यासाठी शाळा आवश्यक त्या सुविधा देतेय की नाही. याची माहिती पालकांनाही असायला हवी. त्यामुळे आतापर्यंत केवळ पालक सभामध्ये यावर चर्चाच होत आली आहे. त्यांना थेट त्या सूचना योग्य वेळी देण्यासाठी आम्ही एसएमएस सुरू करत आहोत. संदीप कुलकर्णी, अध्यक्ष, पायोनियर्स सेकंडरी स्कूल

निरोप वेळेवर मिळेल
आमच्या शाळेचे संकेतस्थळ सुरू होत आहे. आता बर्‍याच पालकांकडे मोबाइल आणि इंटरनेटची सुविधा आहे. त्यामुळे ज्या गोष्टी विद्यार्थ्यांऐवजी थेट पालकांशी बोलायच्या असतात. त्याचा निरोप त्यांना एसएमएसद्वारे देण्यास मदत मिळेल. यामुळे पालकांना वेळेत निरोप मिळेल आणि वेळही वाचेल. उज्ज्वला निकाळजे, पर्यवेक्षिका, शारदा मंदिर कन्या प्रशाला

शॉर्ट मेसेज सर्व्हिस
हा उपक्रम आम्ही शाळेत सुरू केला आहे. कारण, शाळेच्या बसने कधी कधी विद्यार्थ्यांना वेळ लागतो. घरी पालक नसेल तर विद्यार्थी कुठे थांबणार, विद्यार्थी शाळेत येण्यापासून ते घरी सुरक्षित जाण्याची जबाबदारी शाळेची आहे. त्याबरोबरच सूचना वेळेत मिळावी. शिक्षक आणि पालक यांच्यातही संवाद असावा. या उद्देशाने शॉर्ट मेसेज सिस्टिम आम्ही सुरू केली आहे. यात ई-मेल बरोबरच मेसेजही केला जातो. संदीप जगताप, शिक्षक, टेंडर केअर हायस्कूल