आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाळींपाठोपाठ आता साखरेची गोडी महाग, धडक कारवाईमुळे डाळींचे भाव मात्र स्थिर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दीड महिन्यापूर्वी २४ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणारी साखर गुरुवारी घाऊक बाजारात २७.५० रुपये, तर किरकोळ बाजारात २९ रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. महिनाभरातच साखरेचा गोडवा पाच रुपयांनी महागल्याने ग्राहकांच्या खिशाला चाट बसत आहे.

दुष्काळामुळे उसाचे उत्पादन घटले आहे. त्याचा परिणाम साखर उत्पादनावर झाला आहे. कपाशी, मका आणि सोयाबीन हे पीक जास्त पिकवले जात असून डाळीची पिकेही अत्यल्प घेतली जात आहेत. ऊस उत्पादनात २० लाख टनांनी घट झाली आहे. सध्या नवरात्र, दसरा, कोजागरी पौर्णिमा, मोहरम, दिवाळी आदी महत्त्वाचे सण आले आहेत. याचबरोबर दररोजच्या आहारात चहा, शरबत, ज्यूस, मिठाई, प्रसाद, पाहुणचार आदींसाठी साखरेचा वापर केला जातो. परिणामी साखर, तेल, डाळींच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्या तुलनेत पुरवठाही उपलब्ध आहे, पण मागणीचा फायदा करून घेण्यासाठी व्यापारी सरसावले असून भावात कमालीची वाढ करण्यात आली आहे. त्याचा फटका सर्वांना बसत आहे.

२३ हजार ३४० मेट्रिक
टन डाळींचा साठा जप्त

डाळी, खाद्यतेल यांचा साठा करणाऱ्यांवर राज्य सरकार कारवाई करत असून आतापर्यंत २३ हजार ३४० मेट्रिक टन डाळींचा साठा जप्त करण्यात आला आहे. यात मुंबईतील गोदामांमधील २२ हजार ३३६ मेट्रिक टन डाळींचा समावेश असून त्याची किंमत १९० कोटी एवढी असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. ही माहिती देतानाच त्यांनी डाळींचा अवैध साठा आढळल्यास त्याची तक्रार करा, असे ते म्हणाले.