आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरियन व्हेंडर्ससाठी आता ‘किया’ने मागितली जमीन, किया मोटर्सने औरंगाबादेत येण्यासाठी घातली नवी अट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी काही सवलती दिल्या जात आहेत हे लक्षात आल्यावर विदेशी गुंतवणूकदार त्याचा गैरफायदा घेण्याचा कसा प्रयत्न करतात, याचे उदाहरणच किया मोटर्स या कंपनीच्या माध्यमातून समोर आले आहे. कंपनीने आपल्याबरोबर आपल्या ६० व्हेंडर्सलाही डीएमआयसीत मोफत जमीन आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याची नवी अट राज्य सरकारकडे घातली आहे.

औरंगाबादला किया मोटर्स ही कोरियन कंपनी (ह्युंदाईची उपकंपनी) येणार असल्याचे वृत्त उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावर शिक्कामोर्तब केेले होते. या कंपनीमुळे स्थानिक उद्योजकांना सुटे भाग बनवण्याची संधी उपलब्ध होऊन स्थानिक पातळीवर त्यातून रोजगारही वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अशी कोणतीही संधी द्यायला किया मोटर्स तयार नाही, असे कंपनीच्या नव्या प्रस्तावावरून समोर आले आहे.

या संदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, उद्योग मंत्रालयातील सूत्रांनी या माहितीला दुजोरा दिला. या संदर्भात कंपनीशी चर्चा करण्यासाठी उद्योग मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा सेऊल येथे गेले आहेत आणि त्यांना कंपनीच्या या नव्या अटी रद्द करवून घेण्यात यश येईल, असा िवश्वासही या अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

दरम्यान, औरंगाबादला उद्याेग यावेत यासाठी प्रयत्नशील असलेले आमदार अतुल सावे यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. कंपनीची अट परवडणारी नसली तरी लवकरच हा गुंता सोडवण्यात यश येईल आणि कंपनी औरंगाबादला येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपले या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

... तर अौरंगाबादला काय फायदा?
कंपनीने औरंगाबादला उद्योग उभारावा यासाठी डीएमआयसीत कंपनीला जवळपास मोफत जमीन देण्याची तयारी राज्य सरकारने दाखवली होती. आणखीही काही सवलती कंपनीने पदरात पाडून घेतल्या आहेत. मात्र, आता आपल्यासोबत ६० व्हेंडर्सही येतील आणि त्यांनाही त्याच सवलती आणि जागा मिळायला हवी, अशी अट कंपनीने पुढे केली आहे. ती अट राज्य सरकारने मान्य केलेली नसल्यामुळे पुढील हालचाली थांबल्या आहेत. तसे झाले तर या कंपनीचा औरंगाबादला काय फायदा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...