आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता उन्हाळ्यात नाही भाजणार पाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अनेकदा गोरगरिबांना अनवाणी पायांनीच काम करण्याची वेळ येते. यामुळे पाय तर पोळतातच, शिवाय अनेक रोगांनाही आमंत्रण मिळते. गरिबांची होणारी ही अवस्था टाळण्यासाठी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या हॅपी क्लबने गरजूंना विनामूल्य चपला भेट देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

बांधकामाच्या साइट, भाजी मंडई, रेल्वेस्टेशन, बसस्टँड अशा ठिकाणी अनेकदा अनवाणी पायांनी काम करणारे लोक दिसतात. काहींच्या चपला अगदी तुटायला आल्या असतात. अशा गरजूंची ही अवस्था हॅपी क्लबचे सदस्य शेख फय्याज, शेख अहेसान, अब्दुल मुबासीर, आमेर खान, मुश्ताक खान यांना अस्वस्थ करून गेली. कधीकाळी त्यांनी किंवा त्यांच्या घरच्या सदस्यांनी ही अवस्था भोगलेली आहे. इतरांवर ही वेळ येऊ नये यासाठी त्यांनी फोन करा आणि चपला मिळवा हा उपक्रम सुरू केला आहे.

हॅपी क्लबचे शहरात २५० सदस्य आहेत. यातील काही ग्रॅज्युएट, शिकलेले आहेत. बहुतांश सदस्यांची आर्थिक पार्श्वभूमी बेताचीच आहेत. काही जण मोबाइल शॉपीमध्ये, तर काही हॉटेल, कंपनीत काम करतात. त्यांचे वय ३० वर्षांखालील आहे. २५० पैकी १५० सदस्य दर महिन्याला ५० रुपये जमा करतात. यातून एक उपक्रम आखला जातो. यातून खर्चाची रक्कम उभी केली जाते. काही पैशांची गरज भासली तर मुख्य २५ सदस्य ती जमा करतात. यापूर्वी त्यांनी अशाच पद्धतीने हिवाळ्यात गरिबांना फोन करा आणि ब्लँकेट मिळवा हा उपक्रम राबवला होता. जाती- धर्माची बंधने सोडून समाजातील सर्वांच्याच चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी हॅपी क्लब काम करत आहे. या उपक्रमाद्वारे गरजूंना मदत करण्यासाठी शेख फय्याज (९५७९७७७७७२), शेख अहेसान (९८२३२४२६३८), अब्दुल मुबासीर (८१४९४०६६४७), आमेर खान (८४२११५४०४६), मुश्ताक खान (९५२७२८९१४३) यांच्याशी संपर्क करावा.

१५ मिनिटांत चप्पल देणार
हॅपीक्लबच्या सदस्यांचे मोबाइल नंबर विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवर तसेच फेसबुकवर फिरत आहेत. हॅपी क्लबचे सदस्य किंवा कोणालाही अनवाणी पायांचे लोक दिसले तर ते या क्रमांकावर संपर्क साधतात. तेथून हे स्वयंसेवक संबंधित भागातील आपल्या सहकाऱ्यांना कॉल करतात. ज्याने कॉल केला त्यास गरजूशी १५ मिनिटे गप्पा मारण्याचा सल्ला दिला जातो. त्याच्याकडून चपलेचा नंबर घेतला जातो.