आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योगांत कामगार कपात तूर्तास नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने बाजारात मंदीचे सावट पसरलेले आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात कामगार कपात होईल किंवा नाही याबाबतची चाचपणी ‘दिव्य मराठी’च्या वतीने करण्यात आली. यात रुपया सावरल्याने सध्या कामगार कपात झाली नसल्याचे समोर आले आहे. सध्या हे चित्र सकारात्मक असले तरी भविष्यात रुपया घसरल्यास कामगार कपात केली जाऊ शकते, असा कयास अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

1991 नंतर भांडवलदार आणि सरकारच्या धोरणामुळे कामगार कपातीमुळे कामगारांवर बेकारीची वेळ येत आहे. तसेच कंत्राटी कामगार भरण्यावर शासन आणि खासगी कंपन्यांनी भर दिला आहे. त्यामुळे रुपया घसरला किंवा घसरला नसला तरी कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळते, असेही या अभ्यासकांनी स्पष्ट केले.

कंत्राटी पद्धतीमुळे नेहमीच कामगार कपात
भांडवलदारांच्या सोयीसाठी कंत्राटी कामगार पद्धत अवलंबली जात आहे. त्यामुळे रुपया घसरला अथवा घसरला नसला तरी कामगार कपातीबरोबरच नवीन कामगार कामावर घेणे नियमित सुरू असते. त्यामुळे रुपया घसरण्यापेक्षा कंत्राटामुळे कामगारांवर जास्त प्रमाणात बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळत असते. प्रा. राम बाहेती, आयटक

कामगार कपात नाही
घसरलेला रुपया सावरल्यामुळे कामगार कपात करण्याची वेळ आली नाही. मात्र ही घसरण कायम सुरू राहिली असती किंवा रुपया सावरला नसता तर कामगार कपातीची वेळ आली असती. रुपया सावरू लागला हा कामगारांसह सर्वांसाठी शुभ संकेत आहे. बुद्धिनाथ बराळ, आयटक

कामगारांना दिलासा मिळाला
आमच्याकडून मोठय़ा प्रमाणात कामगार पुरवण्यात येतात. सुरुवातीला रुपया घसरत होता, त्यामुळे कामगारांसह सर्वांनाच कपातीची भीती होती. मात्र रुपया सावरल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. प्रदीप मनमाडकर, लेबर काँट्रॅक्टर