आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nss Camp Utkarsh Inauguration Function Issue At Aurangabad

कलावंताने कलेच्या माध्यमातूनच उत्तर द्यावे - कवी देविदास फुलारी यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सध्या जगभरात अनेक ठिकाणी दहशतीच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दडपण आणले जात असून कलावंतांना कला सादर करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. जात, धर्म, पंथ व प्रदेशाच्या माध्यमातून भेदभाव करण्यापेक्षा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्यांना कलांच्या माध्यमातून कलावंतांनी प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन प्रख्यात कवी देविदास फुलारी यांनी केले.

राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘उत्कर्ष’ सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे उद््घाटन मंगळवारी (२० जानेवारी) फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे
अध्यक्षस्थानी होते.

कवी तथा पत्रकार संजय वरकड, बीसीयूडी संचालक डॉ. कारभारी काळे, डॉ. रमेश देवकर, संयोजक डॉ. राजेश करपे, डॉ. चेतना सोनकांबळे, कथाकार दिगंबर कदम यांच प्रमुख उपस्थिती होती. फुलारी म्हणाले की, संवादक्रांतीमुळे जग जवळ आले, परंतु माणूस माणसांपासून दूर जात आहे. भेटणारा प्रत्येक जण समोरच्याची जात, धर्म, आर्थिक, सामाजिक परिस्थिती बघूनच त्याला वागणूक देत आहे. समाजातील माणुसकी हद्दपार होण्याच्या मार्गावर असून दडपशाहीच्या बळावर सत्य दडवले जात आहे. अशा स्थितीत कलावंतांनी मानवता धर्माचे जतन करावे, अशी अपेक्षाही फुलारी यांनी व्यक्त केली. ‘कुठे आहे माझा गाव सांगा’ या फुलारी यांनी सादर केलेल्या या कवितेला रसिकांची दाद मिळाली.

अध्यक्षीय समारोपात कुलगुरू म्हणाले की, तारुण्य हा आयुष्यात काहीतरी घडवून दाखवण्याचा काळ असतो. भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असून युवकांच्या बळावरच देश प्रगतिपथावर जाणार आहे. डॉ. काळे, वरकड यांनीही या वेळी भाषणे केली. अजय देहाडे आणि चेतन चोपडे यांनी ‘दोनच राजे इथे गाजले’ हे गीत सादर केले. डॉ. करपे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी करून दिला. डॉ. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. शरद गावंडे यांनी आभार मानले.