आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूक्लिअर मेडिसीन निदान पद्धतीने 550 जण थायरॉइड आजारातून मुक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आयुष्यभर गोळ्या घेण्याची मानसिक तयारी असलेले औरंगाबादेतील सुमारे ५५० रुग्ण गेल्या साडेचार वर्षांत न्यूक्लिअर मेडिसीन या निदान पद्धतीमुळे थायरॉइड आजारमुक्त झाले आहेत.

मानसिक तणाव, हार्मोन बदलामुळे थायरॉइड (हायपो, हायपर आणि त्यातील ग्रेव्हज, थायरायोडायटिस हे दोन प्रकार) आजार बळावतो. त्याचे रूपांतर कर्करोगातही होऊ शकते. त्यावर औरंगाबादेतील रुग्णांकडे २०१२ पर्यंत गोळ्या घेणे एवढा एकमेव उपाय होता.

मात्र, २०१३ मध्ये औरंगाबादेत न्यूक्लिअर वैद्यकीय निदान पद्धत उपलब्ध झाली. त्यात विशिष्ट प्रकारच्या औषधी, अणूंसोबत शरीरातील विशिष्ट अवयवात सोडली जाते. हे अणू गॅमा किरण उत्सर्जित करून त्या अवयवात आजार किती प्रमाणात, कुठे आणि कशा प्रकारचा आहे, आदी अतिसूक्ष्म माहितीची अचूक प्रतिमा संगणकावर दाखवतात. ती पाहून उपचार सहज, सोपे आणि परिणामकारक होतात, असे या उपचार पद्धतीचे औरंगाबादेतील तज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल जटाळे सांगतात. या उपचाराला १० ते १५ हजार रुपये खर्च येऊ शकतो, असे औषधी गोळ्यांपासून मुक्तता मिळालेल्या नांदेड येथील रुग्णाचे नातेवाईक शेखर देशमुख म्हणाले.
 
असा आहे फरक  
सामान्य उपचार पद्धतीत संपूर्ण बाधित अवयवावर औषधीचा मारा केला जातो. त्यामुळे तात्पुरता आराम मिळतो. न्यूक्लिअर मेडिसीनमध्ये अवयवाच्या नेमक्या बाधित भागातच औषधी पोहोचवल्या जातात. ही औषधी बाधित पेशी समूळ नष्ट करते.  
१९२८ मध्ये इर्रनेस लॉरेन्स यांनी न्यूक्लिअर मेडिसीन निदान पद्धतीचा शोध लावला. त्यात १९५७ मध्ये गॅमा किरणांचा उत्सर्ग करून प्राथमिक संशोधन झाले.
 
पेशींना नष्ट करते
एकदा संगणकावर प्रतिमा दिसली की आयोडीन १३१ औषधी अवयवाच्या बाधित ठिकाणी नेली जाते. तेथे ती बिटा किरणांचा उत्सर्ग करून थायरॉइड पेशींना समूळ नष्ट करते.
 
औषध कुणालाही उपलब्ध होत नाही
आयोडीन १३१ औषधी फक्त भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये नोंदणीकृत डॉक्टरांना ठरावीक प्रमाणातच उपलब्ध होते. त्यांनी त्याचा वापर किती रुग्णांसाठी, किती प्रमाणात केला याचे विवरण सादर करावे लागते. 
 
बातम्या आणखी आहेत...