आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोपवाटिकांचा झाला उकिरडा..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्मचार्‍यांचा तुटवडा, सुरक्षेचा अभाव, मोकाट जनावरांचा वावर, सुरक्षा भिंत नाही आणि चोहोबाजूंनी होत असलेले अतिक्रमण यामुळे ऐतिहासिक हिमायतबागेतील रोपवाटिका उद्ध्वस्त झाली आहे. काही अपवाद वगळता जागोजागी रोपवाटिकांचा उकिरडा झाल्यासारखी स्थिती आहे. लाखोंच्या शेडनेट खराब झाल्या असून जवळपास दीड लाख रोपे अखेरच्या घटका मोजत आहेत. 166 हेक्टरचा परिसर असलेल्या या बागेची देखभाल करण्यासाठी 95 पदे मंजूर आहेत, पण फक्त 30 कर्मचार्‍यांवरच सगळा भार आहे. त्यातही फळे-फुले आणि पिकांच्या संशोधनापेक्षा या कर्मचार्‍यांचा निम्मा वेळ कोर्टकचेर्‍यात जात असल्याने बागेची अवस्था खूपच खराब झाली आहे.

औरंगाबाद शहर व जिल्ह्यासह संपूर्ण भारताच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या शेतकर्‍यांना हिमायतबागेतील रोपवाटिकेबाबत आणि त्यात मिळणार्‍या विभिन्न जातीच्या फळे, फुले आणि झाडांची माहिती आहे. ती विकत घेण्यासाठी येथे लोक येतात. हिमायतबागेच्या 116 हेक्टरपैकी 22 हेक्टर जागा या रोपवाटिकेने व्यापली आहे.

अशी आहे रोपवाटिकेची रचना
बागेची तीन विभागात रचना आहे. ए ब्लॉकमध्ये रोपवाटिकेची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. बी ब्लॉकमध्ये कोरडवाहू फळबाग आहे. त्यात आवळा, बोर, सीताफळ, कवठ, बिबा, जांभूळ तर सी ब्लॉकमध्ये उच्च तंत्रज्ञान प्रकल्प व पुष्प प्रकल्पाची रचना आहे. या शिवाय आंबा, पेरू, नारळ, चिकू, निशीगंध, शेवंती, ग्लाडीओलस, मेरीगोल्ड, परदेशी भाजीपाला रेडकबॅज, स्ट्राबेरी, इंडियन पर्सली, पॅकचॉय, ब्रूसेल्स स्प्राऊड, लिंकबेमडे आदींचा समावेश आहे.

अशी केली जाते लागवड
रोपवाटिकेत रोपांच्या कलम तयार करताना पिशवीत माती व शेणखताचे योग्य मिर्शण भरले जाते. त्यानंतर बियांना बुरशीनाशकाची प्रक्रिया करून पिशव्यांमध्ये लागवड केली जाते व कलमीकरण काळात योग्य कालावधीनंतर दज्रेदार रोपे तयार होतात. ही रोपे परिस्थितीनुसार काही सूर्यप्रकाशात तर काही नाजूक रोपांना रोग व कीड लागू नये म्हणून सुरक्षित जागी ठेवण्यात येतात. यात आंबा, सीताफळ, मोसंबी, चिकू या रोपांची काळजी घ्यावी लागते.


स्वतंत्र यंत्रणा नाही
वार्‍याने कापड खराब होते. तीन वर्षे त्याची कार्यक्षमता असते. यात जनावरे, कुत्री यांचा त्रास आहे. काळजी घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. एका शेडनेटचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याचे अंदाजपत्रक तयार करून दुरुस्तीचे काम चालू करणार आहोत.
डॉ. संजय पाटील, प्रकल्पप्रमुख, उच्च तंत्रज्ञान व पुष्प उत्पादन


बराच वेळा तोटा होतो
चार माळी आहेत.मात्र, निसर्गाचा कोप आणि जनावरांच्या धूडगूसीमुळे रोपांचे नुकसान भरून द्यावे लागते. शेडनेटचा अभाव असल्याने तोटा सोसावा लागतो.
दत्तात्रय भुजबळ आणि नवनाथ निश्चित,ठेकेदार

कोर्टकचेर्‍यातच वेळ जातो
बागेला संरक्षण नाही. जळगावरोडलगत भिंतीचे काम निधीअभावी रखडले आहे. आरेफ कॉलनी ते जळगावरोड हा बागेतून अप्रोच रोड बंद केला पाहिजे. संरक्षण असले तर कामाचे नियोजन होते. खुले मार्ग असल्याने जनावरांचा त्रास आहे. कर्मचार्‍यांना लोक दमदाटी, मारहाण करतात. बर्‍याच वेळा पोलिस केसही केल्या आहेत. बागेचे काम सोडून अतिक्रमणाच्या केसेस लढाव्या लागत आहेत. मंजूर पदे 95 आहेत. मात्र केवळ 30 कर्मचारी आहेत. तांत्रिक संशोधनापेक्षा कोर्टकचेर्‍यात वेळ जातो. दरवर्षी मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून 26 लाख रुपये मिळतात. त्यात रोपवाटिका, खत, औषधे, कार्यालयीन खर्च भागवावा लागतो.
डॉ.तुकाराम तांबे, प्रभारी अधिकारी, हिमायत बाग

रोपवाटिकेची वैशिष्ट्ये
अजिंठय़ाच्या गावरान गोड चिंचेचे 25 हजार, बालानगरचे सीताफळ 15 हजार ,कालीपत्ती चिकू 5 हजार, लखनऊचे पेरू 15 हजार, रंगपूर (मोसंबी) 10 हजार, रत्नागिरी, केशर आंब्याचे 15 हजार, डाळिंब 10 हजार, याशिवाय कवठ, आवळा, कागदी लिंबू, जांभूळ, नारळ आदी फळझाडांच्या कलमांची रोपे येथे विक्रीसाठी उपलब्ध असतात. रोज दीड ते दोन हजार कलमे तयार केली जात असल्याने दिवसभर शासकीय दरानुसार रोपट्यांची विक्री केली जाते. नर्सरीच्या माध्यमातून वर्षाला जवळपास 50 लाख रुपयांच्या आसपास उत्पन्न मिळते. आंबा 45 रुपये, चिंच 50 रुपये, नारळ 20 रुपये, मोसंबी 35 रुपये, सीताफळ 30 रुपये, लिंबू 15 रुपये या दराने रोपांची विक्री होते. मात्र शेडनेटच उद्ध्वस्त झाल्याने कित्येक रोपे जळाली आहेत. उरलीसुरल्यांचीही तीच अवस्था होण्याच्या मार्गावर आहे.


शेडनेट उद्ध्वस्त झाली
शेडनेट याचा अर्थ बंदिस्त शेती. ऊन, वारा, पावसापासून रोपांचे नुकसान टाळता येते. कीटकांच्या संसर्गापासून बचाव करता येतो. उत्तम व दज्रेदार रोपे तयार करता येतात. शिवाय जनावरांचाही धोका नसतो, पण हिमायत बागेत 50 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेली बहुतांश शेडनेटचे फक्त सांगाडेच उरले आहेत. देखभाल नसल्याने ती फाटली आहेत. त्यामुळे ती जागाही पडीक आहे. शेडनेटची कार्यक्षमता 3 वर्षांची असते. काळजी घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. त्यामुळे जवळपास दीड लाख रोपांचा जीव धोक्यात आहे. शेडनेटअभावी कलमांना वेळेवर फवारणी, खत देणे गैरसोयीचे होत आहे. रोपांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे.