आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार मिनिटांत राजाबाजार आरक्षित, वॉर्ड ओबीसी महिलेसाठी झाला राखीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मनपाच्या निवडणूक विभागाच्या गलथानपणामुळे ओबीसी महिला आरक्षणात झालेला घोळ निस्तरण्यासाठी आज एका वाॅर्डासाठी सोडत काढण्यात आली. पाच वाॅर्डांच्या चिठ्ठ्यांतून राजाबाजार वाॅर्डाची चिठ्ठी निघाली आणि तो वाॅर्ड आता सर्वसाधारण महिलाऐवजी ओबीसी महिला प्रवर्गाला आरक्षित झाला. अवघ्या चार मिनिटांत सोडतीचा हा उपद्व्याप उरकण्यात आला.
मनपा निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा घोळ शनिवारपासून सुरू आहे. आरक्षणाची सोडत काढताना ओबीसी महिला प्रवर्गाची सोडत काढतेवेळी प्रचंड गोंधळ उडाला होता. ओबीसी (महिला वगळून) प्रवर्गासाठी निवडलेल्या ४८ वाॅर्डांपैकी १५ वाॅर्ड सोडत पद्धतीने निवडण्यात आले व उर्वरित वाॅर्डांतून ओबीसी महिलांचे वाॅर्ड निवडण्याची तयारी सुरू असताना आधीच आरक्षित झालेल्या वाॅर्डांच्या चिठ्ठ्याही त्यात टाकण्यात आल्याने गोंधळ उडाला. त्यावर आक्षेप आल्यानंतर प्रशासनाची धांदल उडाली व त्यांनी बाजू सावरण्यासाठी वाॅर्ड क्रमांकाच्या चिठ्ठ्यांची पुन्हा तपासणी करून दुसऱ्यांदा आलेल्या चिठ्ठ्या काढून घेतल्या; पण ६२ नं. चिठ्ठी गडबडीत त्या यादीत घुसवली गेली. त्यामुळे पुन्हा संत तुकाराम नाट्यगृहात सोडत घेण्यात आली. त्यात चौधरी काॅलनी, चिकलठाणा (क्र. ३७), राजाबाजार (क्र. ४७), समतानगर (क्र. ६७), जवाहर काॅलनी (क्र. ७७), कांचनवाडी, नक्षत्रवाडी (क्र. १०६) या पाच वाॅर्डांतून ओबीसी महिलांसाठी वाॅर्ड निवडण्यात आला. सकाळी दहा वाजता मनपा आयुक्त प्रकाश महाजन, सहायक आयुक्त रमेश पवार, उपायुक्त किशोर बोर्डे उपस्थित होते. प्रारंभी ए. बी. देशमुख यांनी मागच्या सोडतीत चूक झाल्याचे जाहीर कबूल केले. नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांनी पाचच वाॅर्डांतून सोडत का काढण्यात येत आहे, असा प्रश्न केला. त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. नंतर पाच चिठ्ठ्यांतून एक चिठ्ठी उचलण्यात आली व ती राजाबाजार वाॅर्डाची होती.
अधिका-यांना अपशब्द: सोडत संपल्यावर सहायक आयुक्त पवार व उपायुक्त बोर्डे पत्रकारांसोबत बोलत असताना माजी नगरसेवक भगवान रगडे आरक्षण सोडतीबाबत आक्षेप घेण्यासाठी तेथे आले. त्यांना उपायुक्त बोर्डे यांनी कार्यालयात या, आपण तेथे बोलू, असे सांगत काढता पाय घेतला. त्यांचे असे निघून जाणे रगडे यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना रुचले नाही व त्यांनी संतापून बोर्डेंना उद्देशून अपशब्द वापरले. तेव्हा सभागृह नेते किशोर नागरे, गजानन बारवाल यांनी कार्यकर्त्यांना शांत केले.

प्रक्रिया सुरूच राहणार:
दरम्यान, सातारा-देवळाई परिसर मनपा हद्दीत समाविष्ट करण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात आल्याने सध्याची निवडणूकसंबंधी प्रक्रिया थांबवणार का, या प्रश्नावर उपायुक्त बोर्डे म्हणाले की, आम्हाला निवडणूक आयोगाकडून याबाबत कसलेही आदेश अथवा सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही ही प्रक्रिया निर्धारित वेळेवरच पार पाडणार आहोत. त्यानुसार उद्या ११३ वाॅर्डांचा प्रारूप आराखडा प्रकाशित केला जाईल व त्यावर हरकती व सूचना स्वीकारण्यास प्रारंभ होईल.