आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Octa Ozone Injection Stocks Seized From Aurangabad

अॅक्टोझोन इंजेक्शनचा तीन लाखांचा साठा जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- क्षमतेपेक्षा अधिक दूध द्यावे म्हणून म्हशींना अॅक्टोझोन हे इंजेक्शन देणे सर्रास सुरू होते. मानवी शरीरावर विपरीत परिणाम करणाऱ्या या इंजेक्शनवर बंदी असतानाही त्याची विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा अॅक्टोझोन इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला. काचीवाडा चेलीपुऱ्यात ही कारवाई करण्यात आली.
दुभत्या गायी-म्हशींना पान्हवण्यासाठी आणि अधिक दूध देण्यासाठी त्यांना अॅक्टोझोन इंजेक्शन दिले जाते. या इंजेक्शनवर महाराष्ट्रात बंदी असतानाही शहरात त्याची सर्रास विक्री करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याआधारे सहायक पोलिस निरीक्षक विलास ठाकरे, मच्छिंद्र ससाणे, प्रदीप घोमटे, दत्ता सांगळे, शिवाजी कचरे यांनी सकाळी चेलीपुरा परिसरात काचीवाडामध्ये छापा मारून महंमद फईम महंमद ख्वाजा याला ताब्यात घेतले. त्याने सांगितले की, हे इंजेक्शन कानपूर येथून आणले जातात. तेथून आणलेले इंजेक्शन प्लास्टिकच्या बॉटलमध्ये भरून त्याची विक्री करण्यात येत असल्याचे फईमने सांगितले. कटकट गेट भागात महंमद रिहान महंमद जफर आणि संजयनगर भागातील सचिन संभाजी वायाळ यांच्या घरात या इंजेक्शनचा साठा करून ठेवण्यात येत असल्याचे त्याने पथकास सांगितले. या पथकाने फईमला सोबत घेऊन त्या दोन ठिकाणी छापे मारले. त्या तिघांच्या ताब्यातून तीन लाखांचे अॅक्टोझोन इंजेक्शन जप्त करण्यात आले. यासाठी अन्न औषध प्रशासन विभागाचीही मदत घेण्यात आली.
म्हशींना अशक्तपणा आणणारी हार्मोनची इंजक्शने
- ही हार्मोनची इंजेक्शन आहेत. यामुळे म्हशींना अशक्तपणा येतो. दुधात असलेले नैसर्गिक घटक नष्ट होतात. अशा प्राण्यांचे दूध घेणाऱ्या स्त्री-पुरुषांमध्ये वंध्यत्व येऊ शकते. याखेरीज मुलींमध्ये हार्मोन बदल होऊन पाळी लवकर येऊ शकते.
डॉ. अरविंद मुळे, निवृत्त पशुवैद्यक अधिकारी