आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुजी म्हणाले, तू माझे स्वप्न होतास; पण आता येऊ नकोस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ओडिसी नृत्यात करिअर करायचे, त्यातील सर्वोत्तम शिखर गाठायचे हे स्वप्न उराशी बाळगत मी मोठा झालो. ऐन उमेदीच्या काळात जेव्हा अपघातात माझा एक पाय गेला तेव्हा मी पूर्णपणे कोलमडलो होतो. रोज अश्रुभरल्या नयनांनी गुरूंच्या दारात जाऊन उभा राहायचो. तेव्हा ते म्हणाले होते, "तू माझे स्वप्न होतास. लहानपणापासून मी तयार केलेल्या शिष्यांतील तू सर्वोत्तम होतास. तुझा पाय गेला. माझे स्वप्न भंगले. तुझी ही अवस्था मी पाहू शकत नाही, तू माझ्यासमोर नको येऊस.' त्यांच्या या शब्दांनी माझ्या आयुष्यात चमत्कार घडवला. पाय गेला ही माझ्या आयुष्यात देवाने दिलेली सर्वोत्तम देणगी आहे, हे आज मी अभिमानाने सांगतो, अशा शब्दांत एका पायावर नृत्य करत सर्वांना स्तिमित करणारे ओडिसी नर्तक नित्यानंद दास यांनी आयुष्याची प्रेरणादायी कहाणी कथन केली.

जागतिक नृत्य दिवसानिमित्त महागामी गुरुकुलात आयोजित नृत्योत्सवासाठी नित्यानंदजी शहरात आले होते. भुवनेश्वरच्या या कलाकाराने द्यावापृथ्वी मंचावर पाऊण तास एका पायावर केलेला चपळाईपूर्ण नृत्याविष्कार रसिकांना अचंबित करून गेला. वेगवान नृत्य, हृदयाला भिडणारा भावाभिनय आणि पदन्यासाची विलक्षण पकड सर्वांना चमत्कार पाहत असल्याचा अनुभव देणारी होती. "दिव्य मराठी' प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या या नृत्यसाधनेचा प्रवास जाणून घेतला. अंगावर काटा अन् डोळ्यांत पाणी आणणारा त्यांचा हा प्रवास त्यांच्याच शब्दांत...

नृत्य आयुष्याचे अविभाज्य अंग
ओडिशाच्याबिदईपूर गावात आमचे कुटुंब राहत असे. आमचे वडील रिदम शिक्षण म्हणून मुलांना रिदम शिकवत असत. संकीर्तनाचे कार्यक्रम आजूबाजूच्या गावावर जाऊन ते करायचे, यातून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे. बालपणापासूनच मला नृत्याचे विलक्षण आकर्षण होते. ११ वर्षांचा असताना ओरिया जत्रा पार्टी या थिएटर ग्रुपमध्ये सहभागी झालो. ओरिया जत्रामध्ये सादरीकरण करणारा मी सर्वात कमी वयाचा कलावंत होतो. गुरू बिंदाधरदासजी यांच्या गुरुकुलात ओडिसी नृत्याचे प्रशिक्षणही याच काळात सुरू झाले. नृत्य माझ्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनले. विविध महोत्सवांमध्ये सादरीकरण होऊ लागले. प्रगती होत होती, एक चमकदार उदयोन्मुख कलावंत म्हणून माझ्याकडे कलाजगत पाहत होते. याच ऐन उमेदीच्या काळामध्ये ११ जून २००० रोजी भुवनेश्वरहून बाइकवर गावी जात असताना एनएच ५, हायवेवर ट्रकने मला उडवले. माझ्या आयुष्यातील तो काळा दिवस होता, असे लोक म्हणतात; पण मी म्हणतो, ईश्वराने माझ्यावर त्या दिवशी सर्वाधिक कृपेचा वर्षाव केला.

अपघातानंतर माझा एक पाय काढावा लागेल, हे डॉक्टरांनी सांगितले. खूप प्रयत्न करूनही तो पाय वाचवता येणे शक्य नव्हते. मी शुद्धीत नव्हतो. माझे नृत्य माझे आयुष्य आहे, पाय नसेल तर मी नृत्य करू शकणार नाही. म्हणून घरचे पाय काढता कामा नये, अशा भूमिकेत होते. पण, मला वाचवायचे तर पाय काढणे हा एकच पर्याय त्यांच्यापुढे आला. पाय काढून टाकण्यात आला. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा भयंकर दु:खात बुडालो. नृत्याविना जगून मी काय करू, हाच प्रश्न होता. मी म्हणालो, मला मरू द्यायचे असते. खूप रडायचो. आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्ने उरात होती, माझ्या करिअरचा आलेख उंचावर असताना पाय गेला. मी रोज देवाला म्हणायचो, माझ्या आयुष्याचा उद्देश काय आहे ते मला सांग. पाच वर्षांपर्यंत मी रोज हाच प्रश्न घेऊन फिरत होतो. रोज गुरुजींच्या समोर जाऊन उभा राहायचो. मला नृत्याशिवाय काहीच समोर दिसत नव्हते.

गुरुजींनीस्वत:च्या पायाला बांधले
गुरुजीइतर शिष्यांना शिकवत असायचे. माझे ज्युनियर, सोबतचे कलावंत सगळेच पुढे चालले होते आणि मी सगळे पाहत उभा होतो. मन खूप खिन्न व्हायचे, रडत बसायचो. एक दिवस गुरुजींना सांगितले मला अशाही स्थितीत तुम्ही शिकवा. पण ते तयार नव्हते. मी नृत्याला सुरुवात केली, सतत पडत होतो; पण नृत्य करतच होतो. तेव्हा गुरुजींनी स्वत:च्या पायाला बांधले. एक पाय बांधून त्यांनी मला धडे देण्यास सुरुवात केली. मला नवी ऊर्जा मिळाली. रात्र-रात्रभर मला झोप येत नसे. केव्हा एकदा पूर्णपणे नृत्य करू लागेन, असे वाटत होते. एकच पायावर संपूर्ण शरीराचा भार पेलणे आणि नृत्य करणे खूप कठीण होते. पण झोप लागूच देणार नाही, ते स्वप्न खूप महत्त्वाचे असते.

नृत्य माझ्यासाठी तसेच होते. सहा महिन्यांच्या अथक मेहनतीनंतर २९ मे २००५ ला भुवनेश्वरच्या रवींद्र मंडप येथे मी "पंगुं लंघयते गिरीं' हा माझा पहिला रंगमंचीय प्रयोग सादर केला. सर्वांनी माझ्या उराशी लावून घेतले. माझ्या जिद्दीला सलाम केला. मी मात्र त्या दिवशी एक अनुभव केला की, ते नृत्य मी करतच नव्हतो. देवच माझ्यामध्ये उतरून नृत्य करत होता. चपळाई, वेगवान नृत्य, अचूक पदन्यास, हस्तमुद्रा मी कसे करतो, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. तेव्हा माझे उत्तर असते, मी करतच नाही, देव करून घेतो. खरे सांगायचे तर मला स्वत:लाच अजूनही आश्चर्य वाटते. एक महत्त्वाचे सांगायचे ते म्हणजे मी जेव्हा फक्त नर्तक असलो असतो तेव्हा कदाचित मला इतकी प्रसिद्धी मिळाली नसती किंवा माझे कौतुक झाले नसते; पण एका पायावर नृत्य करण्याची जादू या अपघातातून देवाने मला दिली सर्वाेत्तम बनवले.

३५० वर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
सध्या भुवनेश्वरमध्ये कलाश्रम नावाच्या केंद्रातून विद्यार्थ्यांना नृत्य प्रशिक्षण देत आहे, तर माझ्या गावामध्ये लवुडी नृत्य हा लोकनृत्याचा प्रकार मी शिकवतो. देश- विदेशामध्ये रंगमंचीय सादरीकरण करतो. ओडिसी नृत्याला मी नव्या
आयामांवर आणून ठेवीन, असा मला विश्वास आहे.
कलामांनी दिली ११ मिनिटे
२००९मध्ये तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना भेटण्याची संधी मिळाली. भेटीची तारीख ठरली अन् मला दीड मिनिट बोलण्याची संधी आधीच ठरवून देण्यात आली; पण गंमत अशी की, माझे नृत्य पाहून माझ्याशी बोलताना डॉ. कलाम ११ मिनिटे बोलले. त्यांनी माझी स्तुती केली. ही संधी कदाचित मी दोन पायांवर नाचत असतो तर मिळाली नसती.