आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेच्या शाळा अधिकारी दत्तक घेणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गरिबांच्या शाळा म्हणून ओळख असलेल्या सर्व जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता आहे. गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी या शाळांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यासाठीच शिक्षणाधिकाऱ्यांपासून ते केंद्रप्रमुखांपर्यंत सर्व अधिकारी जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या शाळा दत्तक घेणार आहेत. शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी ही माहिती दिली. यासाठी काॅर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचाही (सीएसआर) आधार घेण्यात येणार आहे.
शुक्रवारी संत एकनाथ रंगमंदिरात शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद यांच्या वतीने आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रस्तावित शाळांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी नितीन उपासनी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. या कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, शिक्षण सभापती विनोद तांबे, उपशिक्षणाधिकारी एन. के. देशमुख, विजय चौधरी, आर. ठाकूर, प्रियाराणी पाटील, व्ही. के. बेंद्रे, के. पी. ताठे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रशांत जोशी यांनी आयएसओ मानांकनाविषयी मार्गदर्शन केले. डॉ. अभिजित चौधरी यांनी सर्व शाळांना आयएसओ मानांकनासाठी सहकार्य केले जाईल. शाळांचा दर्जा सुधारणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.
उपासनी यांनी सांगितले की, औरंगाबाद विभागात एकूण १३ शाळा आयएसओ मानांकन प्राप्त आहेत, तर औरंगाबाद जिल्ह्यात शाळांना मानांकने मिळाली आहेत. अद्याप २३ शाळांना मानांकन मिळणे बाकी आहे. १५३ शाळांचे प्रस्ताव आयएसओसाठी आहेत. या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी १५ जूनपासून दत्तक योजना सुरू करण्यात येणार आहे. केवळ हा दर्जा मिळवूनच थांबायचे नाही तर तो टिकवण्यासाठीही सर्वांनी काम करायचे आहे. या वेळी उपस्थित शिक्षक मुख्याध्यापकांना आयएसओ मानांकन प्राप्त शाळांचे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन दाखवण्यात आले.
शिक्षण विभागात बदल्यांच्या नावाखाली गडबड ?
अचानक बदलीचे पत्र हाती येताच शिक्षण उपसंचालक कार्यालयात हाहाकार माजला आहे. या नियमबाह्य बदल्या असल्याचा पावित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत कर्मचारी आणि लिपिक, वरिष्ठ लिपिक, अकाउंटंट यांच्या बदल्यासंबंधीची सूचना आणि यादी सूचना फलकावर लावण्यात आली आहे. बदल्या झाल्यावर अमुक एक ठिकाण नको, नवरा-बायकोंची बदली एकाच ठिकाणी हवी, अशी ओरड कर्मचारी करत असतात. परंतु या विभागात झालेल्या बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्येच जुंपली आहे. जाणीवपूर्वक हा प्रकार केला असून या बदल्या नियमबाह्य आहेत. वास्तविक, नियमानुसार तीन वर्षांची सेवा एका ठिकाणी पूर्ण होईपर्यंत बदली करता येत नाही. बदल्या करण्याचे आदेश जानेवारीतच द्यायला हवे होते. आता नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. विभागात तीनच महिला कर्मचारी होत्या.
त्यांच्यादेखील विभागात बदल करण्यात आला आहे. किमान एक तरी महिला कर्मचारी विभागात असायला हवी. हा भेदभाव आहे, असा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला आहे.
महिलांवर अन्याय
शिक्षण उपसंचालक कार्यालयात असलेल्या तीन महिला कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे आता विभागात एकही महिला असणार नाही. बाहेरून येणाऱ्या महिला अधिकारी, शिक्षिका यांना जर काही अडचणी आल्या तर त्या कुणाला सांगायच्या, असा प्रश्न विचारला जात आहे.
झाडे लावा झाडे जगवा
पर्यावरण संवर्धनासाठी सर्व शाळांना शंभर झाडे दिली जातील. त्यांनी ही झाडे लावून त्यांचे संवर्धन करायचे आहे. विद्यार्थ्यांना घेऊन लोकसहभागातून हा उपक्रम राबवायचा आहे.