आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Officers Fights For Marathwada's Water, But Politician Not Aleart

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्‍यासाठी अधिका-यांचा लढा, मात्र राजकारण्यांची उदासीनता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पश्चिम महाराष्‍ट्रातील धरणांतून मराठवाड्याला हक्काचे पाणी द्या, अशी मागणी करून आपल्याकडील भूमिपुत्र लोकप्रतिनिधी मोकळे झाले असले तरी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिका-यांनी प्रशासकीय लढा सुरू ठेवला आहे.


पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुर्तास मिटला असला तरी वरील धरणांतील पाणीसाठा लक्षात घेता मराठवाड्यातील शेतीसाठी किमान एक रोटेशन देता यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ते पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांचा याला विरोध आहे. मराठवाड्यातील राजकारणी विरुद्ध पश्चिम महाराष्‍ट्रातील मातब्बर नेते असा वाद होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात उलटे चित्र आहे. येथील आमदार पश्चिम महाराष्‍ट्रातील गब्बर नेत्यांशी मिळतेजुळते घेण्याचा प्रयत्न करत असताना भविष्यात अडचण होऊ शकते, याची कल्पना असूनही अधिकारी मात्र कायद्याचा तोकडा आधार घेऊन पाण्यासाठी निकराने प्रयत्न करत आहेत.


ऐन पावसाळ्यातही जायकवाडी भरले नसल्याने ‘पिण्यासाठी पाणी सोडा’ अशी मागणी औरंगाबादच्या अधिका-यांनी केली. गेल्या तीन वर्षांपासून जायकवाडीच्या खालच्या भागाला शेतीसाठी रोटेशन देण्यात आलेले नाही. त्यामुळे रोटेशनसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.


मुख्यमंत्र्यांसमोर 10 वेळा वाचला पाढा
विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल आणि जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी ऑगस्टपासूनच पाण्याची मागणी लावून धरली. मुख्यमंत्र्यांकडे किमान 10 वेळा ही मागणी मांडण्यात आली, पण परिणाम झाला नाही. या प्रश्नाला राजकीय पाठबळ मिळाले असते तर आतापर्यंत पाणी मिळाले असते.


अधिका-यांवर दबाव
उन्हाळ्यात वरील धरणांतून जायकवाडीसाठी नऊ टीएमसी पाणी सोडण्यात आले. पाणी मिळाल्याचे लेखी पत्र द्यावे यासाठी पश्चिम महाराष्‍ट्रातील मंत्र्यांनी दोन अधिका-यांवर दबाव आणला होता, तरी ते दबावास बळी पडले नाहीत.


असे झाले प्रयत्न
> गतवर्षी आमदार बंब यांनी मराठवाड्यातील आमदारांना एकत्र आणून दबाव गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर औरंगाबादच्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले होते.
> खासदार चंद्रकांत खैरे यांनी पाण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांना घेराव घातला होता .
> 16 सप्टेंबरला आमदार डॉ. कल्याण काळे यांनी विभागीय आयुक्तालयासमोर उपोषण केले. परंतु त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. दुस-या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून केवळ आश्वासन मिळाल्यावर ते थांबले. या प्रश्नावर मराठवाड्यातील सर्व आमदार एकत्र आले नाहीत.


रोटेशनच्या पाण्यासाठी 16 ऑक्टोंबरपासून उपोषण
मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना एकत्र आणण्याचा मी गतवर्षी प्रयत्न केला. त्याला ब-यापैकी यश आले. या वेळी वरील धरणे भरली असल्याने दोन रोटेशनचे पाणी मिळावे यासाठी येत्या 16 तारखेपासून उपोषणास बसणार आहे. प्रशासकीय प्रयत्न सुरू असल्याबद्दल चांगले वाटले, पण आम्हीही माघार घेतलेली नाही.’’ प्रशांत बंब, आमदार, गंगापूर.