आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना भेटणार अधिकारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. सरकारच्या वतीने अनेक उपाययोजना करूनही आत्महत्यांचे प्रमाण कमी होत नसल्याने किमान तीन हजार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या घरी अधिकारी भेट देणार आहेत. या माध्यमातून कुटुंबीयांना कोणत्या योजना मिळाल्या, अजून काय मदत करता येईल, याची माहिती घेण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली. 
 
मराठवाड्यात या वर्षी ५८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०१५-१६ आणि २०१६-१७ या वर्षात २१८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१२-२०१६ दरम्यान शेतकऱ्यांना मोठ्या दुष्काळाला तोंड द्यावे लागले. २०१६ मध्ये चांगला पाऊस झाल्यानंतरही आत्महत्या थांबलेल्या नाहीत. जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत ११३३ तर जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६ या वर्षात १०५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 

शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबाला सरकारकडून एक लाखाची मदत दिली जाते. मात्र त्यानंतर पुनर्वसन करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. अनेकदा खासगी संस्थांच्या माध्यमातून मदत दिली जाते. मात्र ती सर्वांपर्यंत जातेच याची शाश्वती नसते. त्यामुळे पहिल्यांदाच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन माहिती घेणार आहेत. 

एकाचदिवशी अधिकारी देणार भेटी : सर्वअधिकारी एकाच दिवशी तीन हजारांवर कुटुंबीयांची भेट घेतील. यात विभागीय उपायुक्तांपासून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आदींचा सहभाग असेल.
 
अधिकारी नेमके काय करणार? 
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासकीय लाभ मिळतात की नाही याची पाहणी करण्यात येईल. विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी सर्व्हेसाठी प्रश्नावली तयार करत आहेत. कुटुंबीयांना कोणत्या मदतीची आवश्यकता आहे, प्रशासनाकडून कोणती मदत मिळू शकते याची माहिती या सर्व्हेच्या माध्यमातून घेतली जाईल. 

पंधरा दिवसांत नियोजन करणार 
^आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची स्थिती या सर्व्हेच्या माध्यमातून जाणून घेण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसांत नियोजन पूर्ण करून सर्व अधिकारी शेतकऱ्यांच्या घरी जातील. -डॉ. पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त 
 
बातम्या आणखी आहेत...