आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Officers With Corporators Politics, Thorat On Target

अधिकाऱ्यांसह नगरसेवकांचे राजकारण; थोरात निशाण्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नवीन मनपाच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत तरी सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारे प्रश्न देऊन त्यावर प्रशासनाकडून उत्तर मागवले जाईल, ही अपेक्षा फोल ठरली आहे. मर्जीतील कंत्राटदारांची बिले निघत नसल्याने व लेखा विभागातील अधिकाऱ्यांच्या राजकारणाचा भाग होऊन मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांच्या नेमणुकीच्या विषयावर २० जून होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाकडून उत्तर मागवण्यात आले आहे.

शनिवारी सर्वसाधारण सभा होत आहे. नवीन मनपात नागरिकांच्या प्रश्नावर नवे नगरसेवक आवाज उठवतील असे वाटत असले, तरी पहिल्या सभेत मात्र ते कितपत पाहायला मिळेल याची शंकाच आहे. येत्या सर्वसाधारण सभेत मुख्य थोरात यांच्या नेमणुकीबाबत प्रश्न मांडण्यात येणार आहे. कार्यक्रम पत्रिकेतही त्याचा आवर्जून समावेश करण्यात आला आहे.

याचा तुमच्या-आमच्याशी काय संबंध?
नगरसेवक कैलास गायकवाड यांनी शिस्तीत वेळेआधी चार प्रश्न देत थोरात यांच्या नेमणुकीचा मुद्दा उचलला आहे. त्यांनी विचारलेले प्रश्न पाहता त्यांचा रस्ते, पाणी सफाई आणि सामान्य नागरिकांच्या समस्यांशी काहीच संबंध नाही हे दिसते.

>मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांची महापालिकेत केव्हा प्रतिनियुक्ती झाली?
>त्यांच्या नियुक्तीला महासभेची मान्यता घेण्यात आली आहे का?
>त्यांची मुदत एक वर्षासाठी असेल, तर मुदत संपल्यावर नव्याने मुदतवाढ घेण्यात आली का?
>सभेची मान्यता नसल्याने थोरात यांची नेमणूक कायद्याला धरून आहे का?

अधिकाऱ्यांचे राजकारण
लेखा विभागातील राजकारण कायम चर्चेचा विषय आहे. लेखाधिकारी संजय पवार व थोरात यांच्यातील संघर्ष वेळोवेळी पाहायला मिळतो. या आधीचे आयुक्त डाॅ. हर्षदीप कांबळे यांनी थोरात यांचे अधिकार कमी करून पवार यांच्याकडे अधिकार दिले होते. सध्याच्या आयुक्तांनी थोरात यांच्याकडे सगळे अधिकार दिले. त्यातून हा विषय समोर आला असावा, असे बोलले जाते.

नगरसेवकांचाही हेतू
थोरात यांच्या नेमणुकीबाबत गायकवाड यांनी एकट्यानेच प्रश्न विचारला असला, तरी मर्जीतील कंत्राटदारांच्या बिलासाठी लेखा विभागात खेटे मारणाऱ्या नगरसेवकांचाही त्यात अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसते. लेखा विभागात नगरसेवकच अधिक दिसतात. मर्जीतील कंत्राटदाराला घेऊन त्यांच्या बिलांच्या फायली मार्गी लावण्यात धन्यता मानणारे नगरसेवकही यात उतरले.