आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोडे तेल वधारले; ‘फोडणी’ पाच रुपयांनी महागली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या गोड्या तेलाच्या भावात सोमवारी अचानक 5 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे आता तेलाची फोडणी महाग झाली आहे. सरकारने तेल आयातीवर अबकारी कर लागू केल्याने तेलाच्या भावात वाढ झाल्याचे शहरातील तेल विक्रेत्यांनी सांगितले.
होलसेल तेलाच्या भावात हजार रुपयांची वाढ झाल्याने आता किरकोळ तेलाच्या किमतीतही 5 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता करडी तेलाचा भाव 140 रुपये लिटर, शेंगादाणा तेल 140 रुपये, सोयाबीन तेल 75-77 रुपये लिटर, पामतेल 65-70 रुपये लिटर झाला आहे. हिवाळा असल्याने सध्या तिळाच्या तेलाची मागणी वाढली आहे. तीळ उत्पादनात यंदा मोठी घट झाली आहे. तिळाचे तेल पूर्वी 130 रुपये लिटर होते. तेच आता 150 रुपये प्रतिलिटर झाले आहे. वनस्पती तुपाचे भाव मात्र स्थिर आहेत. तेलाच्या भावात वाढ होत असल्याने ग्राहक तेलाचा वापर कमी करत आहेत. त्यामुळे पूर्वी पाच लिटर तेल विकत घेणारा वर्ग आता तीन लिटर तेल विकत घेत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

काही दिवसांत निर्णय
शासनाने सध्या सुट्या तेलाच्या विक्रीवरील बंदीच्या आदेशावर तूर्तास स्थगिती दिली आहे. शहरात किरकोळ तेल विक्री मोठय़ा प्रमाणावर होते. पॅकिंगच्या तेलासाठी ग्राहकांना आगाऊ पैसे मोजावे लागणार असल्याने या आदेशासंदर्भात बैठका सुरू आहेत. येत्या काही दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे. तनसुख झांबड, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉर्मस.

-शहरात सुट्या तेलाला मागणी आहे. त्याची विक्री मोठय़ा प्रमाणावर होत आहे. पॅकिंगच्या तेलाला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नाही. ग्राहकांना सुट्या तेलातील शुद्धतेवर विश्वास आहे. त्यामुळे शासनाने सक्ती करू नये. जगन्नाथ बसैये बंधू, गुलमंडी, बसैये तेल भंडार, व्यवस्थापक

तेलाचा प्रकार जुने भाव नवे भाव
करडी साधे 135 140
करडी डबल फिल्टर 140 145
शेंगादाणा साधे 135 140
शेंगादाणा डबल फिल्टर 140 145
सोयाबीन तेल 75-77 70-72
पाम तेल 60-65 65-70
तिळाचे तेल 130 150
वनस्पती तूप (किलो) 60 -
(टीप : तेलाचे भाव लिटरमध्ये आहेत.)

तेल विक्रेत्यांना तूर्तास दिलासा
तेलाची विक्री पॅकिंगमध्ये करण्याची सक्ती अन्न व औषध प्रशासनाने डिसेंबर 2012 पर्यंत केली होती; परंतु यावर कुठलाच निर्णय शासनाने घेतला नसल्याने खाद्यतेल विक्रेत्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात मराठवाडा ट्रेड अँड कॉर्मस आणि तेल विक्री संघटना यांची प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय होणार असल्याचे संकेत मराठवाडा ट्रेड अँड कॉर्मसचे अध्यक्ष तनसुख झांबड यांनी दिले.

27 सप्टेंबर 2012 रोजी दिलेल्या सुट्या खाद्यतेल विक्रीवरील बंदीच्या आदेशाला तूर्तास स्थगित द्यावी, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली होती; परंतु अन्न व औषधी प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईमुळे व्यापारी आणि ग्राहकांमध्ये नाराजी पसरली होती. दरम्यान, यापुढे विक्रेत्यांना स्वत: पॅकिंग करून विक्री करावी लागणार असल्याचे निर्णय प्रशासनाने दिला होता. खाद्यतेल विक्रीच्या परवान्याची मुदत डिसेंबर 2012 पर्यंत होती. तोपर्यंत विक्रीची परवानी द्यावी, असे निवेदन मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉर्मसने दिले होते. यासंदर्भात प्रशासन आणि मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉर्मसचे पदाधिकारी, तेल विक्रेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसांत यासंदर्भात निर्णय होणार आहेत.

पॅकिंगच्या तेलाला 20 रुपये आगाऊ मोजावे लागणार असल्याने ग्राहक व विक्रेते सध्या संभ्रमात आहेत. शहरात पॅकिंग तेलापेक्षा सुट्या तेलाला मोठी मागणी आहे. त्यामुळे शासनाने सक्ती करू नये. ग्राहक आपल्या गरजेनुसार तेल खरेदी करतात. त्यामुळे तेलात जो विक्रेता भेसळ करेल, त्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे.