आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांढऱ्यावरच्या काळ्या अक्षरांमुळे नव्वदीनंतरही जगण्याची ऊर्जा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वयाने नव्वदी ओलांडलेली, काहींची तर शंभरी उंबरठ्यावर येऊन ठेपलेली; पण जगण्याची ऊर्जा आणि उत्साहासमोर वयाची ही उंची अक्षरश: ठेंगणी झालेली. कुठून आली ही ऊर्जा? काजू, बदाम खाण्यातून? उत्साहवर्धक औषधांतून? नव्हे. ही ऊर्जा मिळाली आहे पांढऱ्यावरच्या काळ्या अक्षरांतून. शंभरीकडे वाटचाल करणाऱ्या सहा जणांनी आज त्यांच्या ऊर्जेचे हे ‘रहस्य’ नकळतपणे उलगडले. 
 
संस्कृत पंडित डा. दामोदर गर्गे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त या सहा ज्येष्ठांचा गौरव आज औरंगाबादमध्ये केला जातो आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यावेळी नकळतपणे हे गुपित उलगडले गेले. स्वत: पंडित गर्गे (९९.५ वर्षे), दत्तात्रय पंतोजी (९२ वर्षे), जयसिंग गुलाटी (९५ वर्षे), मधुकर केतकर (९२ वर्षे), भगवंत कुळकर्णी (९२ वर्षे) आणि चंद्रावती कुकडे (९० वर्षे) यांना शनिवारी सायंकाळी ‘दिव्य मराठी’ने एकत्र आणले आणि त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. आपल्या जगण्यातला आनंद भरभरून सांगताना ही मंडळी अजिबात थकत नव्हती. बालपणापासूनच्या जगण्याचे सुत्र सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर गतस्मृतींचा पटच वाचायला मिळत होता. साधारण तीन तास चाललेल्या या गप्पांच्या मैफलीतून समोर आलेले त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य आणि ऊर्जेचे स्त्रोत असे.
 
वाचन हा प्रत्येकाचा आनंद
सहाही जणांच्या बोलण्यात त्यांना वाचनातून मिळणारा आनंद हा सामायिक मुद्दा होता. कोणाला गझल आवडतात तर कोणाला धार्मिक साहित्यात आनंद मिळतो. कोणी हाती मिळेल ते वाचतो तर कोणाला वैचारिक  साहित्याची अजूनही भुरळ पडते आहे. कोणी सर्वच प्रमुख वृत्तपत्रांच्या वाचनात रममाण होतात ही बाब त्यांच्या बोलण्यातून समोर आली.
 
संयम हाही मुलाधार
सहाही ज्येष्ठांच्या सांगण्यातून आणखी एक सामायिक बाब प्रकर्षाने समोर आली ती म्हणजे संयम. कोणत्याही बाबीचा अतिरेक होऊ द्यायचा नाही ही प्रत्येकाची आयुष्यभराची धारणा राहिली आहे. विशेषत: आहारातल्या संयमावर सगळ्यांनीच भर दिला आहे. त्यामुळेही असेल, पण बहुतेक जण मधुमेह, रक्तदाबासारख्या सामायिक आजारांपासूनही दूर राहिला आहे हे विशेषत्वे सांगायला हवे.
 
व्यायामाचीही संगत
सहाही जणांना व्यायामाची सवय आहे. पायी फिरणे हा सर्वांनीच पत्करलेला व्यायाम प्रकार. त्यासाठी सकाळी लवकर उठणे आलेच. चंद्रावती कुकडे या तर आताआतापर्यंत शिर्षासन करत होत्या. आता ते करणे जरा अवघड जाते, असे त्या सांगत होत्या. योगासनांचेही त्यांना सवय आहे. मधुकर केतकर यांनी ठरवून व्यायाम केला नाही; पण त्यांची नोकरीच अशी होती की त्यांना खूप फिरावे लागे. सहेतूक का असेना, पण फिरण्याच्या व्यायामाची सवय झाली, असे ते सांगतात.  

मनाने अजूनही झाले नाही निवृत्त
या सर्वांनीच शासकीय किंवा निमशासकीय नोकरी केली आहे. पण सर्वांबाबत एक वैशिष्ट्य असे की त्यांना सेवानिवृत्त होऊन किमान ३४ वर्षे झाली आहेत. पंडित गर्गे यांना तर सेवानिवृत्त होऊन तब्बल ३९ वर्षे झाली आहेत; पण यापैकी सर्वच जण मनाने अजूनही निवृत्त झालेले नाहीत आणि तेही त्यांच्या जगण्यातल्या ऊर्जेचे इंधन असावे याची खात्री त्यांच्याशी बोलल्यानंतर नक्की पटते.
 
बातम्या आणखी आहेत...