आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरच्यांनी दूर लोटलं, आता सोडवत नाही तिचा हात, वृद्ध बेघर दांपत्यांनी रात्रनिवारागृहात राहण्यास दिला नकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ऊन-थंडी-वाऱ्यात अनेक लोक घर नसल्याने उघड्यावर राहतात. पण कायद्याने मानवतेच्या दृष्टीनेही असे राहणे योग्य नाही. मनपा आयुक्तांनी पाहणी केली, सर्वेक्षणही झाले अन् त्यांना निवारागृहात ठेवण्याचे आदेश दिले. मात्र, एकही व्यक्ती निवारागृहात गेली नाही. याच्या कारणांचा डीबी स्टारने शोध घेतला. अनेकांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यातून पुढे आलेली कारणे आणि त्यावरील उपाय याबाबत डीबी स्टारची वृत्तमालिका...

"ऐनआयुष्याच्या संध्याकाळी रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनी दूर लोटले... आज आम्ही भीक मागून असे रस्त्यावर जगतोय... अशाही परिस्थितीत फक्त आयुष्यभराचा जोडीदारच साथ कायम ठेवून आहे. रात्री फुटपाथ, रस्त्याच्या कडेला झोपताना जोडीदार जवळ असेल तर एक भक्कम मानसिक आधार असल्यासारखं वाटतं... ही साथ सुटू नये असं वाटतं,' हे बोल आहेत अनेक बेघर वयोवृद्ध दांपत्यांचे. मनपाच्या वतीने बेघर व्यक्तींसाठी रात्रनिवारागृहे चालवली जातात. निवारागृहांची स्थिती उत्तम आहे, पण तिथे जाण्याची कारणे काही अंशी भावनिक, तर काही अंशी गमतीशीरही आहेत. आजघडीला १४८ लोक औरंगाबादमध्ये रस्ते, फुटपाथ, मंदिरे, उड्डाणपुलाखालच्या जागी झोपतात, तर सोय असूनही रात्रनिवारागृहांमध्ये थांबणाऱ्यांची संख्या क्षमतेपेक्षा अत्यल्प आहे.

महानगरपालिकेच्या वतीने शहरात सहा रात्रनिवारागृहे चालवली जातात. ज्यांना शहरात घर नाही अशा सर्व संवर्गातील व्यक्ती या निवारागृहामध्ये मोफत राहू शकतात. सहाही रात्रनिवारागृहांची स्थिती चांगली आहे. मोठे मोठे हॉल, पाणी, मनपाच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार आदी सुविधा या निवारागृहांमध्ये पुरवल्या जातात.
मात्र, असे असतानाही निवारागृहांमधील व्यक्तींची संख्या कमी आणि रस्त्यावरील व्यक्तींची संख्या अधिक हे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मनपाच्या प्रकल्प विभागाने रस्त्यावरील प्रत्येक व्यक्तीला रात्रनिवारागृहामध्ये हलवण्याच्या उद्देशाने एका रात्रीत शहरातील सर्व भागांमध्ये जाऊन सर्वेक्षण केले. सर्वेक्षणावेळी सर्वांना नजीकच्या रात्रनिवारागृहाविषयी माहिती दिली, काहींना त्याच वेळी रात्रनिवारागृहामध्ये पोहोचवलेदेखील. मात्र, सर्वेक्षणाच्या दुसऱ्या दिवशी एकही नवा सदस्य या निवारागृहांमध्ये दाखल झाला नाही.
रात्रनिवारा गृहांमध्ये मिळणाऱ्या सुविधा
रात्रनिवारा गृहामध्ये सर्वांना मोफत निवासाची व्यवस्था आहे. ६० वर्षांवरील व्यक्ती, अपंग, अंधांना निवासासोबतच दोन वेळचे भोजनही मोफत दिले जाते. झोपण्यासाठी गादी, पांघरण्यासाठी ब्लँकेटची सोय. आजारी पडल्यास मनपाच्या आरोग्य केंद्रांमध्ये मोफत उपचार दिले जातात. तसेच व्यसनमुक्तीसाठी प्रत्येक महिन्याला समुपदेशन शिबिरे घेतली जातात. सर्व निवारागृहांमध्ये अधीक्षक आणि २४ तास सुरक्षा रक्षक नेमल्याने सुरक्षाही चोख आहे.

शहरात भिकाऱ्यांची संख्या आहे जास्त
एकूण१४८ बेघरांपैकी तब्बल १२४ भिकारी होते. उर्वरित व्यक्तींपैकी कुणी राेजंदारी कामगार, हॉटेल कामगार, रुग्ण, अपंग होते.

आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत
रस्त्यावरराहणाऱ्याप्रत्येक व्यक्तीने रात्रनिवारागृहात यावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिस प्रशासनाशी- देखील आम्ही संपर्क साधला आहे. सामाजिक संस्था, प्रतिष्ठानांकडूनही बेघर लोकांना रात्रनिवारागृहांमध्ये आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत - उदयजऱ्हाड, सहायकप्रकल्प अधिकारी, मनपा

मनपाची सर्व निवारागृहे चांगलीच
महापालिकेच्यावतीनेचालवल्या जाणाऱ्या सहाही रात्रनिवारागृहांची स्थिती चांगली आहे. या ठिकाणी क्षमतेपेक्षा खूप कमी बेघर राहतात. त्या तुलनेत रस्त्यावर अधिक लोक राहतात. आम्ही त्यांचे सर्वेक्षण करून रात्रनिवारागृहामध्ये येण्याबाबत सुचवले होते. मात्र, त्यांच्याकडून नकार मिळतो. ओमप्रकाशबकोरिया, आयुक्त,मनपा

- रात्रनिवारागृहांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळी व्यवस्था आहे. रस्त्यावर भीक मागणारे, दीर्घकालीन उपचारासाठी बाहेरगावाहून आलेली काही वयोवृद्ध जोडपी होती. त्यांचा मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रश्न होता, ‘निवारागृहांमध्ये आम्हाला एकत्र थांबता येईल का? आम्ही एकमेकांपासून दूर राहणार नाही. म्हातारपणात हिच्या/यांच्याशिवाय मला दुसरे कोण आहे?'
- रस्त्यावर झोपणाऱ्यांमध्ये बिडी पिणे, तंबाखू खाणे, दारू पिणे ही व्यसने प्रामुख्याने दिसली. आपण जर रात्रनिवारागृहांमध्ये गेलो तर आपल्या या व्यसनांवर बंधने येतील. मनाप्रमाणे वागता येणार नाही या समजुतीतूनही अनेकांनी नकार दिला.
- भीक मागणे, शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये भिकाऱ्यांनी भीक मागण्याचा स्पॉट डेव्हलप केलेला आहे. आपण जर रात्रनिवारागृहामध्ये गेलो तर हा स्पॉट दुसरा एखादा भिकारी बळकावू शकतो.
- दिवसभर भीक मागत असलेली जागा, जिथे ओळखीचे अनेक बेघर लोकांशी त्यांचे स्नेहाचे संबंध निर्माण झालेले असतात. थोडक्यात तेथील वातावरणाशी ते पूर्णपणे सरावलेले समरस झालेले असतात. त्यामुळे मानसिकदृष्ट्या ते ठिकाण त्यांना सोडवत नाही.
- रस्त्यावर राहणाऱ्यांमध्ये भिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. रात्रनिवारागृहामध्ये गेले तरी भीक मागण्यासाठी पुन्हा आपल्या नेहमीच्या ठिकाणी जावेच लागेल. भीक मागण्याचा स्पॉट रात्रनिवारागृहाजवळ असेल तर ठीक, दूर असेल तर ऑटोरिक्षानेच जावे लागेल. जाण्या येण्यास त्रास होत असेल तर त्यापेक्षा निवारागृहामध्ये गेलेलेच बरे.
शहरातील प्रमुख ठिकाणी आढळलेले भिकारी
मध्यवर्ती बसस्थानक १६
घाटी परिसर २०
रेल्वेस्थानक ३८
महावीर चौक उड्डाणपूल ०९
गजानन महाराज मंदिर ०५
सेव्हन हिल्स उड्डाणपूल ०६
मोंढा नाका उड्डाणपूल १०
दर्गा चाैक ०३
संग्रामनगर उड्डाणपूल ०७
क्रांती चौक उड्डाणपूल १६
शनिमंदिर ०९
रात्रनिवारागृहे आणि त्यांची सद्यस्थिती
संतगाडगेबाबा सभागृह, रेल्वेस्थानक (स्त्री-पुरुष)
मनपा शाळेची इमारत, मोतीकारंजा (स्त्री-पुरुष)
मनपा शाळेची इमारत, गांधीनगर (पुरुष)
सामाजिक सभागृह, सेंट्रल नाका (स्त्री-पुरुष)
जुने वॉर्ड कार्यालय, चिकलठाणा (स्त्री)
सामाजिक सभागृह, कोहिनूर कॉलनी (स्त्री-पुरुष)
नामदेव खेडकर ,९९२२८९३३५८
बातम्या आणखी आहेत...