आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाच्या शोधात शहर गाठणाऱ्या वृद्धाचा रस्त्यावरच करुण अंत !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/ढोरकीन - भयाण दुष्काळामुळे गाव सोडून औरंगाबाद गाठणाऱ्या वृद्धाचे भोग शहरातही संपले नाहीत. मिळेल ते काम करून तग धरणाऱ्या या वृद्धाचा बुधवारी रस्त्यावर मृत्यू झाला. एक व्यक्ती अखेरच्या घटका मोजत आहे, असे एका जागरूक युवकाने वारंवार कळवूनही पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यामुळे या वृद्धाला प्राण गमावावे लागले. जगन्नाथ काशीनाथ सोनवणे (५२, रा. ढोरकीन, ता. पैठण) असे त्यांचे नाव आहे.
मोलमजुरी करून बिकट परिस्थितीत आयुष्य कंठणारे जगन्नाथ सोनवणे भावाच्या मदतीने अनेक वर्षे गावात ताडपत्री शिवण्याचे काम करत होते. मात्र, दुष्काळामुळे कामही ठप्प झाल्यामुळे काही काम असेल तर सांगा, अशी विनवणी ते प्रत्येकाकडे करत. परंतु स्थिती जास्तच बिघडल्यामुळे कामाच्या शोधात ते औरंगाबादेत आले. अनेक महिन्यांपासून मिळेल ते काम करून सोनवणे उदरनिर्वाह करत होते. मंगळवारपासून ते मोंढा नाका भागातील जैन पेट्रोल पंपाच्या बाजूला पडून होते. त्यांची ही अवस्था पाहून मदन जैस्वाल या युवकाने बुधवारी दुपारी एकच्या सुमारास जिन्सी पोलिसांना फोन करून "एक वयस्कर शेवटची घटका मोजत आहे, त्याला उपचाराची गरज आहे' असे सांगितले. दीडच्या सुमारास पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना घाटीत नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यानंतर जैस्वाल यांनीच सोनवणे यांच्या नातेवाइकांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाइकांनी औरंगाबादेत धाव घेतली.

दुष्काळामुळे सोडले गाव
जगन्नाथ सोनवणे दोन भाऊ, आईसह गावात राहत होते. त्यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांना पिकांच्या मळणीसाठी लागणारी ताडपत्री शिवून त्यांनी दिवस काढले. मात्र, शेतीची कामेच ठप्प असल्यामुळे या कामावर गंडांतर येताच त्यांनी शहर गाठले. यानंतर एका भावाने हॉटेल सुरू केले, तर दुसरे भाऊ मोलमजुरी करत होते.

...तर वाचला असता जीव
मदनजैस्वाल म्हणाले, मी वारंवार फोन करून पोलिसांना लवकर येण्यासंबंधी विनवत होतो. पहिल्यांदा मला गाडी पाठवतो, असे सांगितले. दुसऱ्यांदा फोन केल्यावर गाडी निघाली, असे सांगण्यात आले, तिसऱ्यांदा फोन केल्यावर आता गाडी पोहोचेलच, असे उत्तर मिळाले. घटनेचे गांभीर्य ओळखून माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी धावले असते तर सोनवणे यांना रुग्णालयात दाखल करता आले असते अन् कदाचित त्यांचा जीवही वाचला असता.