आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमीला केवळ घाटीत नेलेच नाही, तर नातेवाईक येईपर्यंत थांबले बकोरिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पडेगाव येथील कादरी हॉस्पिटलसमोर शनिवारी रात्री अकराच्या सुमारास अज्ञात वाहनाने योगेश श्रीकांत पानसरे यांना धडक दिली. त्यांच्या दोन्ही पायांवरून गाडी गेल्याने ते गंभीर जखमी झाले. ते मदतीसाठी याचना करत होते. मात्र कोणीही पुढे आले नाही. योगायोगाने महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया तेथून शहराकडे परतत होते. त्यांनी तातडीने गाडी थांबवून पानसरे यांना घाटीत दाखल केले. नातेवाईक येईपर्यंत ते घाटीतच थांबले होते. 

पानसरे हे स्टरलाइट कंपनीत अभियंता पदावर आहेत. ते देवगिरी व्हॅलीत राहतात. अकराच्या सुमारास चारचाकीतून कादरी हॉस्पिटल परिसरात गेले होते. गाडीतून उतरले असता त्यांना अज्ञात वाहनाने उडवले. यात त्यांच्या पायांना गंभीर इजा झाली. काही वेळातच ओमप्रकाश बकोरिया हे त्यांच्या गाडीने शहराकडे परतत होते. पानसरेंना पाहून त्यांनी गाडी थांबवली. मागून येणारी एक इंडिका थांबवून त्या गाडीत स्वत: बकोरिया घाटीत आले. यासाठी त्यांना लष्करातून निवृत्त झालेले आणि सध्या महावितरणमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे संतोष कासवे तसेच नीलेश राठोड, उमेश देवगिरीकर यांनी मदत केली. वेळीच उपचार मिळाल्याने पानसरे यांचे प्राण वाचले. मात्र दुर्दैवाने त्यांचा उजवा पाय काढावा लागला. 

स्ट्रेचरसाठी केली धावपळ 
सव्वाअकरावाजता बकोरिया जेव्हा पानसरे यांना घाटीत घेऊन आले तेव्हा अपघात विभागात स्ट्रेचर उपलब्ध नव्हते. बकोरियांना पाहून घाटीत स्वयंसेवक म्हणून काम करणारे किशोर गायकवाड तेथे आले विचारपूस केली. एका खोलीत घाटी प्रशासनाने कुलूप बंद करून ठेवलेले स्ट्रेचर आणले पानसरे यांच्यावर उपचार सुरू झाले. बकोरिया यांनी फोनवरून घाटीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर धावपळ सुरू झाली. सामाजिक कार्यकर्ते अकील अहेमद ऊर्फ हाफीज साहब, जुनेद शेख, मोहम्मद आसेफ, ताहेर पटेल यांनी पानसरे यांच्या उपचारासाठी मदत केली. रात्री उशिरा पानसरे यांचे कुटुंबीय घाटीत पोहोचले. त्यानंतर त्यांना आधार देऊन बकोरिया घाटीतून निघाले. 
बातम्या आणखी आहेत...