आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओंकारचा जीवनपट उलगडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एक विशेष मुलगा असूनही आयुष्याचा गहन अर्थ सांगणाऱ्या कविता आमच्या मुलाने रचल्या. घरी भेटायला येणाऱ्या पाहुण्यांना आम्ही त्या कविता आवडीने दाखवायचो. "बालश्री' पुरस्कार मिळाल्यानंतरही त्याच्या प्रतिभेविषयी शंका घेऊन त्याला समजतं का सगळं, असा प्रश्न विचारला जायचा. त्यामुळे माझ्या कविता यापुढे कोणाला दाखवू नका, माझे कौतुक तुमच्यापर्यंतच ठेवा, असे १४ वर्षीय (आता त्याचे वय २२ आहे) मुलाने मुलाने म्हटल्याचे ओंकारचे वडील अॅड. देवेंद्र वैद्य यांनी सांगितले.
आरंभ ऑटिझम सेंटरच्या वतीने शनिवारी मराठवाडा महसूल प्रबोधिनीत आयोजित कार्यक्रमात झालेल्या प्रकट मुलाखतीत अॅड. वैद्य बोलत होते. आठवडाभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. याचा समारोप सांस्कृतिक कार्यक्रम आणि ओंकार वैद्य या विशेष तरुणाच्या मुलाखतीने झाला. या वेळी ओंकारने त्याच्या आई-वडिलांनी त्याचे संघर्षपूर्ण जीवनपट उलगडले. कार्यक्रमाला आमदार अतुल सावे, आरंभ संस्थेचे सचिव डॉ. मिलिंद कंक, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक धनंजय लांबे, स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, "आरंभ'च्या संचालिका अंबिका टाकळकर, बाळासाहेब टाकळकर, पालक अनिता जहागीरदार यांची उपस्थिती होती. अॅड. वैद्य म्हणाले, सृजनात्मक लेखनासाठी ओंकारला तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते बालश्री पुरस्कार मिळाला. त्याने हिंदी, इंग्रजी आणि मराठी अशा तिन्ही भाषांमध्ये सामान्य माणसालाही अवघड जाईल अशा कविता केल्या आहेत. त्या कविता घरी भेटायला येणाऱ्या व्यक्तींना आम्ही दाखवायचो. पण लोकांनी त्याच्या प्रतिभेवर शंका उपस्थित केली की आम्हाला वाईट वाटायचे. तेव्हा ओंकार स्वत:च कौतुक तुमच्यापर्यंत ठेवा, असे म्हणायचा. ओंकार सध्या जर्नालिझमचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करत आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे अॅड. वैद्य म्हणाले. ओंकार म्हणाला, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यागणिक मला नवी प्रेरणा मिळत गेली. त्यातूनच माझा विकास झाला. यामध्ये अनेकांची मला मदत मिळाली. त्याची आई म्हणाली, ओंकार आठ महिन्यांचा असताना त्याच्या आजाराविषयी आम्हाला कळाले. त्या दिवशी आम्ही खूप रडलो. पण नंतर त्याला उभे करणे हेच आमचे मिशन झाले.

"आरंभ'च्या वतीने सुरू असलेल्या सप्ताहात आठवडाभर वृक्षारोपण, योग प्रशिक्षण, पपेट शो, डॉक्टरांचे मार्गदर्शन, करिअरविषयक मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

‘आज की पार्टी मेरी तरफ से’
सांस्कृतिक कार्यक्रमात ‘आज की पार्टी मेरी तरफ से’, बाजीराव मस्तानीचे ‘मल्हारी’ आणि ‘सुरमई अंखियोंवाली’, ‘चंदा है तू’ अशा गाण्यांवर मुलांनी धमाल नृत्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्नेहल गाडगे, स्नेहल काळे, पायल राठी, ललिता खापरे, मानसी कुलकर्णी, प्रीती मडके, भावना गाडे यांनी सहकार्य केले. मिलिंद दामोदरे यांनी आभार मानले.